नाशिक : शाळा म्हटले की सकाळी दहा वाजता हजेरी अन् सायंकाळी पाच वाजता सुट्टी. अनेकदा वर्गामध्ये शिकवणी न होता मुले इतरत्र फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बहुतेकदा नकारात्मकच असतो. परंतु, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील अवलिया शिक्षकाने हा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले असून, केशव गावीत सरांच्या प्रयत्नातून कोरोना संकटातही हिवाळीत नियमित शाळेची घंटा वाजत राहिली. त्यांनी कोरोना संकटात शाळेच्या बंदिस्त वर्गखोल्यांऐवजी गावाजवळच्या उंच भागावर ताडपत्रीचा निवारा करून शाळा भरवून ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या हरसूलपासून ४० किलोमीटरवर हिवाळी गाव आहे. पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या या आदिवासी भागात केशव गावित या शिक्षकांनी आदर्श निर्माण करीत वर्षाचे ३६५ दिवस अन् बारा तास चालणारी जिल्ह्यातील पहिलीच शाळा म्हणून येथील शाळेला यापूर्वीच ओळख निर्माण करून दिली होती. परंतु, आता गत दीड ते दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरातील जीवनमान कोरोना संकटामुळे ठप्प झालेले असताना हिवाळीत मात्र ही शाळा सुरू होती. त्यामुळे या अतिदुर्गम भागात ऑनलाइन सोयी - सुविधांचा अभाव असतानाही येथील मुले शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकून राहिली आहेत. हिवाळी शाळेला या उंचीवर नेऊन ठेवणारा दुवा म्हणजे केशव गावित. १० ते १२ वर्षांपूर्वी हे तरुण शिक्षक शाळेवर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी शाळेचे रुपडे पालटण्यास सुरुवात केली. आपल्या उच्च शिक्षणाचा व अनुभवाचा उपयोग करीत त्यांनी आदिवासी मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे ठरविले. त्यांच्या मते विद्यार्थी केवळ विद्यार्थी राहू नयेत तर ते ज्ञानार्थी बनावेत. या विचारातून त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून अध्यापन पद्धती विकसित केली. कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करण्यावर जोर दिला. त्यामुळेच आज येथील सर्व विद्यार्थी दोन्ही हाताने एकाच वेळी लिहिण्याचे कसब आत्मसात करू शकले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. यातून त्यांनी हिवाळीत परिपूर्ण असे शैक्षणिक ज्ञानमंदिर निर्माण केले आहे.
बारा तास चालणारी शाळा
हिवाळीत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शाळेची वेळ आहे. विद्यार्थ्यांचे सर्व पाढे पाठ असून, संविधानाची कलमेही पाठ केली आहेत. ॲबेकससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे धडे येथे दिले जातात. तसेच येथील विद्यार्थी विविध कलागुणांमध्ये पारंगत आहेत. यामध्ये पेंटर, फिटर, टीचर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर आदी कामे मुले स्वतः करतात. शाळेचा आवारही आकर्षक असून, येथील हँगिंग गार्डन, तरंग चित्रे, रंगविलेल्या आकर्षक भिंती, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य इतर विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, या सर्वाचे श्रेय केवळ केशव गावित सर यांनाच जाते हे निश्चित.
आदिवासी भागात बालपण गेल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून होतो. त्यामुळे शाळेवर रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत अध्यापन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होऊन इतर उपक्रम राबविण्यास वाव मिळाला. हिवाळीसारख्या दुर्गम भागात काम करण्याची संधी मिळाल्याने काम करण्यास अधिक प्रेरणा मिळाली.
- केशव गावित, शिक्षक
040921\04nsk_9_04092021_13.jpg~040921\04nsk_10_04092021_13.jpg
शिक्षक केशव गावीत व हिवाळी शाळेतील मुले~शिक्षक केशव गावीत व हिवाळी शाळेतील मुले