नाशिक : कोणताही स्कूल बसचालक हा त्या बसचा कॅप्टन असतो. त्यामुळे त्याची राहणी, वर्तन हे सारे कॅप्टनला साजेसे असावे. चालकाचे वाढलेले मोठे केस, उघडे असलेले शर्टाचे बटन, तोंडात तंबाखू अशी पूर्वीची प्रतिमा बदलवून आता स्मार्ट आणि नीटनेटकी प्रतिमा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. नाशिक फर्स्ट व प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तिडके कॉलनीतील नाशिक फर्स्ट येथे हा कार्यक्रम पार पडला. ते पुढे म्हणाले की, स्कूल बसचालक हा मुलांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनत चालला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानावे असे वाटत असेल तर मुलांशी, पालकांशी, शाळेशी आणि एकूणच समाजाशी त्यांचे वर्तन आदर्श असले पाहिजे. त्यांनी शिस्त पाळावी. सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय परिक्षेत्रात सुमारे एक हजार ८०० स्कूल बसेसला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. या वाहनांसाठी खास नियमावली शासनाने निश्चित केली आहे. नियमावली अस्तित्वात असली तरी चालकांकडून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एकेका वाहनात क्षमतेहून अधिक विद्यार्थी कोंबण्याचे प्रकार होतात. या साऱ्यांवर या प्रशिक्षण वर्गात चर्चा होणार असून, पालकांसह चालकांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे भरत कळसकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुरेश पटेल यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जांबोटकर यांनी आभार मानले.
शालेय बसचालकांनी स्वप्रतिमा बदलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:37 AM