नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबरला शासन आदेश काढून शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अनुदानित, विनाअनुदानित, अंशत:अनुदानित शाळांतील शिपाई पद संपुष्टात आणल्याचा आरोप करीत शासनाच्या या निर्णयाविरोधात १८ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने ११ डिसेंबर रोजी आदेश काढून शिपाई पद संपुष्टात आणले आहे. त्यामुळे यापुढे शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, कामाठी, प्रयोगशाळा परिचर ही पदे सरळसेवेने भरता येणार नाही. परिणामी कंत्राटी पद्धतीने ही पदे भरून मानधनावर त्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. हा निर्णय अन्यायकारक असून त्यामुळे अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी बेरोजगार होणार असून त्यांच्या पुनर्वसनासह संस्थाचालकांसमोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात १८ डिसेंबरला राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंद ची हाक दिली आहे. आंदोलनात शिक्षण क्षेत्रातील घटकांनी सहभागी व्हावे, तसेच संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तांना निवेदन द्यावे, असे आवाहन शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
इन्फो-
ऑनलाईन शिक्षणही राहणार बंद
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या आंदोलनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शिक्षक व संस्थाचालकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे सध्या सुरू असलेले शिक्षणही शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संस्था महामंडळाकडून देण्यात आली आहे.