येवला : तालुक्यातील देवळाणे येथील जिल्हा परिषदेच्या बोंबले वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरली. ग्रामस्थांनी शिक्षकाची मागणी करत तर ‘शिक्षण आमचा हक्क, आमचे शिक्षक आम्हांला मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी सुमारे २४ चिमुकल्यांनी परिसर दणाणून सोडला.जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून पटसंख्या २४ आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी २ शिक्षक कार्यरत आहे. मात्र, केंद्र प्रमुख सुदाम हरिश्चंद्रे यांनी तोंडी सूचना देऊन परमेश्वर दासरे नावाच्या शिक्षकाची १९ आॅगस्ट रोजी दुगलगाव येथे बदली केली. त्यामुळे १ ते ४ वर्गांसाठी गणेश आतकरे हे एकच शिक्षक उरले आहेत. दुगलगाव येथे बदली झालेल्या दासरे या शिक्षकाचे वेतन बोंबले वस्ती शाळेत निघते. मात्र, केंद्र प्रमुखांनी तोंडी सुचना देवूनच त्यांची बदली केली आहे. यामुळे बालकांचे शैक्षणीक नुकसान होत असून आमचे शिक्षक परत आम्हांला द्या, अशी मागणी वारंवार करु नही शिक्षक मिळत नसल्याने सर्व पालकांनी गुरुवारी मुलांची शाळा पंचायत समीती कार्यालयाच्या आवारतच भरवली. पंचायत समिती सभापती आशा साळवे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, कांतीलाल साळवे यांनी पालकांना समजावून सांगत सोमवारपर्यंत शिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले त्यानंतर तातडीने संबधित शिक्षकास बोंबले वस्ती शाळेवर हजर होण्याचे आदेश दिले. आदेशाची प्रत पाहताच पालकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच आम्रपाली जाधव, शिक्षण समीती अध्यक्ष दिलीप बोर्डे, पालक योगेश रहाणे, संभाजी रहाणे, राजेंद्र साळवे, भाऊसाहेब काळे, अशोक बोंबले, राजेंद्र गोसावी, विजय काळे, संदीप दाणे, भास्कर बनकर, सुनील जाधव, अरुण जाधव यांच्यासह चांगदेव मोरे, नामदेव बोर्डे, निवृत्ती बोर्डे, महेंद्र जाधव आदींसह ग्रामस्थही उपस्थित होते.
पंचायत समितीत भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:58 PM