नाशिक : शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, मोदी यांचे भाषण ऐकविण्याची तयारी सर्वच माध्यमांच्या शाळांकडून पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील बहुसंख्य शाळांनी रेडिओ, टीव्ही, तसेच प्रोजेक्टर यंत्रणेची व्यवस्था केली आहे. देशातील भावी पिढीबरोबर संवाद साधण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. जपान दौऱ्यावरून परतलेले मोदी यांनी तेथील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्याच पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर ते भाषण देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकविण्याची योग्य यांत्रिक व्यवस्था शाळांकडूनच केली जावी, असे आवाहन केंद्राकडून सर्व राज्यांमधील शिक्षण विभागाला करण्यात आले आहे. त्यादृष्टीने शहरातील सर्वच माध्यमांच्या शाळांनी आपल्या सोयीनुसार व्यवस्था केली आहे. शिक्षक दिनाचा पारंपरिक कार्यक्रम सकाळी सर्वच शाळांमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाच्या बाबतीत पूर्वकल्पना दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला याबाबत आवाहन प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी गंगापूररोडवरील थोरात सभागृहात जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, रहीम मोगल, नवनाथ औताडे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)