नाशिक : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेची मुदत उलटूनही अद्याप अनेक शाळांनी ऑनलाईन निकाल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा स्थितीत निकालाला उशीर होऊ नये म्हणून शाळांना निकाल ऑनलाइन भरणे व निश्चितीची कामे प्राधान्याने एकाच वेळी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शाळेकडून हलगर्जीमुळे निकाल रखडल्यास संबंधित शाळाच जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे कामाला गती देऊन गांभीर्याने निकालाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहावीच्या ९८ हजार ९४९ विद्यार्थ्यांच्या नववीची परीक्षा व दहावीचे मूल्यांकनावर निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला सुरुवात झाली असून ही मुदत ३० जूनला संपुष्टात आल्यानंतर २ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उलटूनही जिल्ह्यातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांचीच माहिती भरली गेली; असून आतापर्यंत गुणदान पूर्ण व अंतिम न झाल्याने प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे शिक्षकांनी निकाल भरुन ते त्याच वेळी निश्चित करण्याचे काम गांभीर्याने करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या असून सोमवार (दि.५) पासून संबंधित शिक्षकांना त्यांनी तयार केलेले गुणदानपत्रक विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
---
मूल्यांकनानंतर मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत निकाल २ जुलैपर्यंत भरण्याची अंतिम मुदत होती. रविवारी
रात्रीपर्यंत केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती शाळांकडून करण्यात आली. तर उर्वरित ३० टक्के विद्यार्थ्यांची माहिती भरली गेली; पण निश्चिती केली नाही. याशिवाय १० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अपूर्ण आहेत. त्यामुळे सोमवारपासून निकाल भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
---
निकाल संकलनाला उशीर झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन भरण्यासाठी वाढवून वेळ मिळाला पाहिजे. पासवर्ड रिसेट करून काहींना उशिरा मिळाला. त्यामुळे शिक्षकांना निकाल भरण्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली पाहिजे.
- एस. बी देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ.
--
वेळेत निकालाचे संकलन केले. त्यामुळे निकाल भरण्यात अडचण आली नाही; मात्र ज्यांना अडचणी आल्यात त्यांना मुदतवाढ मिळावी. निकालपत्र सादर करण्यासाठी २ जुलै पर्यंत मुदत होती. परंतु शिक्षण मंडळाने ही मुदत ९ जुलै पर्यंत वाढवून दिल्याने शिक्षकांना सोयीचे झाले.
- किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक, नवरचना विद्यालय .
---
अद्याप निकालाचे काम पूर्ण झालेले नाही. गुणदान पद्धती नवीन असल्याने सुरुवातीला शिक्षकांना काही अडचणी आल्या असल्या तरी आता वेगाने काम सुरू असून जसे निकाल तयार होतील तेव्हाच निश्चिती केल्यास निकाल लवकर भरल्या जातील.
- के. बी. पाटील, अध्यक्ष, विभागीय परीक्षा मंडळ, नाशिक
--
पॉइंटर-
६० टक्के शाळांचा टप्पा पूर्ण
दहावीतील विद्यार्थी - ९८,९४९
मुले -५२,८०३
मुली - ४६,१४६