अझहर शेख, नाशिक : वालदेवी नदीकाठाजवळ असलेल्या पिंपळगाव खांब परिसरात रविवारी (दि.१०) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पत्र्याचा डबा त्याच्या दिशेने ताकदीने भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामुळे किरकोळ दुखापतीवर वन्यप्राण्याचा हल्ला निभावून गेला. या हल्ल्यात अभिषेक सोमनाथ सारसकर हा बालंबाल बचावला.
शौचासाठी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अभिषेक हा वालदेवी नदीकाठाच्या दिशेने गेला होता. तेथे बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून चाल केली. यावेळी कमरेला पंजाचे नखं लागल्याने दुखापत झाली. अभिषेक याने घाबरून न जाता प्रसंगावधान राखत जवळ असलेला पत्र्याचा डबा बिबट्याच्या अंगावर वेगाने भिरकावला. यामुळे बिबट्याने परिसरातील झाडीझुडपात धूम ठोकली. अभिषेक याने आरडाओरड करत घराच्या दिशेने धाव घेतली. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकही धावले. अभिषेकने घडलेला प्रकार सांगितला असता त्याची आई आरती सारसकर यांनी तातडीने त्याला नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या कमरेजवळ किरकोळ जखम झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अभिषेक बालंबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाने वनपरिमंडळ अधिकारी उत्तम पाटील यांनी वन्यजीव रेस्क्यू वाहनातून पिंजरा आणून घटनास्थळी लावला. तसेच रात्री ९ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनीही घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली.
रहिवाशांनी सतर्क राहावे, खबरदारी घ्यावी
काही दिवसांपासून वडनेरगेट, विहितगाव, पिंपळगाव खांब, पाथर्डी रोड या भागातील शेतशिवारात बिबट्यांचा संचार वाढू लागला आहे. यामुळे या भागात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे. वनविभागाकडून देखील या भागातील रहिवाशांना संध्याकाळपासून पहाटेपर्यंत बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या लहान मुलांना उघड्यावर किंवा नदीकाठालगत नैसर्गिक विधीसाठी जाऊ देऊ नये. आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना सोबत काठी वगैरे घेऊन जावे, असे आवाहन गाडे यांनी केले आहे.