नाशिक : बहीणभावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त शालेय विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाज रक्षणाचे कार्य करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून या पोलिसांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
रक्षाबंधन एक पवित्र, सांस्कृतिक, भावनिक अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. बहिणीने भावाप्रति मंगलकामना करत राखी बांधावी अन् भावाने रक्षणाचे वचन तिला द्यावे, अशा गोड भावबंधात गुंफलेला हा सण मानवधन संस्थेच्या विद्यार्थिनींनी पोलिसांसोबत साजरा केला. मागील वर्षी कोरोना काळात सामाजिक सेवाकार्य करणारे डाॅक्टर, घंटागाडीवर काम करणारे स्वच्छतादूत व विविध व्यावसायिक यांना राखी बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्यानंतर यावर्षीही कोरोनासारख्या भयावह महामारीत समाजाच्या रक्षणार्थ ज्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले, अशा कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना राखी बांधून विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमात विद्यार्थिनींनी अंबड पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर व सहकारी तसेच पाथर्डी फाटा येथील शहर वाहतूक शाखा युनिट-३चे नाईक सचिन जाधव यांना राखी बांधली.