नाशिक : गावातील स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत गुरुवारी (दि.१८) केल्या. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघटनेच्या मदती घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा घेऊन गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या. परंतु, स्थानिक पदाधिकारी व ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यास व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात सहकार्य होत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी केली. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींचे सहकार्य घेऊन शाळा सुरू करण्याचा सल्ला शासनस्तरावरून देण्यात आला आहे. परंतु, त्यासाठी येणारा खर्च करण्यास ग्रामपंचायत तयार होत नसल्याने शाळांची अडचण होत असल्याचे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, रेड झोनमध्ये नसलेल्या नववी, दहावी व बारावीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरू करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत, तर अकरावीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास अनेक ग्रामपंचायतींची तयारी नसल्याचे मुख्याध्यापक संघाच्या सभासदांनी सांगितले. मात्र शाळांनी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने शाळा सुरू करण्याची तयारी करावी ग्रामपंचायतींकडून सहकार्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्थरावर मदतीसाठी नियोजन करणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळवून देण्याविषयी आश्वस्त करण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागून दिवसाआड शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. यात सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस एक गटाचे वर्ग, तर मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुसऱ्या गटांचे वर्ग असे एक दिवसआड शाळा सुरू करण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या मदतीने जुलैपासून शाळा ; शिक्षणाधिकाऱ्यांचा एसएमसी, पीटीएची मदत घेण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 2:38 PM
स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत.
ठळक मुद्देकोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने शाळा सुरू करा शालेय व्यवस्थानन समिती, शिक्षक पालक समितीचीही मदत घ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्या सुचना