नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकस्तरावर शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी), पालक शिक्षक संघ (पीटीए) व कोरोना प्रतिबंध समितीच्या समन्वयातून निर्णय घेऊन शक्य तिथे नववी दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या सुचना यापूर्वी दिल्या होत्या. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा उघडण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळा सुुरू होऊ शकल्याने नाही. मात्र अनेक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाच्या सुचनांनुसार ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. अशा शाळांची व कनिष्ठ महाविद्यालयांची शिक्षण विभागाकडे कोणतीही संकलित माहिती नाही, त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र लिंक तयार केली आहे. या माध्यमातून संबंधित शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु झाले अथवा नाही याविषयी माहिती शिक्षण विभागाला ४ जुलैपर्यंत कळविण्याचे अवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले असून प्राप्त होणाऱ्या अहवालांतून शिक्षणाधिकारी ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वी शाळा व्यवस्थापनांना पत्र दिले होते. मात्र त्यानुसार कारवाई करण्यास अनेक अडचणी असल्याचे मुख्याध्यापक संघटनेकडून सांगितले जात असून स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीकडून अपेक्षित सगकार्य मिळत नसल्याचीही मुख्याध्यापक संघाची ओरड आहे. तसेच अनेक मुख्याध्यापक हे ५५ वर्षांच्या वरील आहे. त्यामुळे त्यांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वर्क फ्रॉम होम करावे की प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहवे याविषयीही संभ्रम कायम आहे.
मुख्याध्यापक बैठक घेणार कसेशिक्षण विभागाने ५५ वर्षांवरील वयोगटातील शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुचना केली आहे. परंतु, जवळपास ७० ते ८० टक्के मुख्याध्यापक हे ५५ वर्षावरील आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व स्थानिक कोरोना प्रतिबंध समिती यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेत जावे किंवा नाही याविषयी मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. तसेच अनेक पालकांना व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ऑनलाईन बैठकांचे तंत्र अवगत नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात नियोजन बैठका कशा घेणार, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.