नाशिक : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक असून सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये हा खेळ सक्तीचा करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांनी केले आहे.नाशिक जिल्हा बुध्दिबळ संघटना आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे रंगुबाई जुन्नरे शाळेत ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे आणि इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे यांचा शनिवारी (दि.29)सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रंगुबाई जुन्नरे शाळेतील बुध्दिबळ केंद्राचेही ठिपसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ठिपसे यांनी बुध्दिबळ खेळाला शालेय स्तरावर प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, बुध्दिबळ खेळात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. विदेशांत शाळांमध्ये बुध्दिबळ सक्तीचा तसेच अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. त्याचप्रमाणे भारतातही विशेषत: महाराष्ट्रात प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर बुध्दिबळ सक्तीचा केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते. बुध्दिबळाचा उपयोग मुलांच्या बौध्दिक विकासावर होत असतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मम फ्राईडनेही बुध्दिबळामुळे हिंसक व्यक्तीही शांत होऊ शकते असा निष्कर्ष काढला आहे. विशिष्ट आजारांमध्ये जसे अल्झायमर, स्मृतीभ्रंश,मानसिक विकृती असलेल्यांनी जर बुध्दिबळाचा सराव केला तरीही शारीरीक फायदा होत असतो. इतर वेळीही जर बुध्दिबळाचा सराव केला तरीही या व्याधी शरीराला जवळ करीत नाही. बुध्दिबळात एखादा चॅम्पियन होऊ शकतो. मात्र खेळतांनाचा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक मानसिक शक्ती देणारा हा खेळ आहे. त्याचमुळे प्रत्येक शाळांनी बुध्दिबळाला प्राधान्य द्यायला हवे असे ठिपसे म्हणाले. यावेळी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा.दिलीप फडके, प्रविण ठिपसे, भाग्यश्री ठिपसे, शरद वझे, नाशिक बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सुनील शर्मा, रंगुबाई जुन्नरे विद्यालयाचे मुख्याध्यापिका नंदा पेटकर आदी उपस्थित होते.
शाळांमधून बुध्दिबळ सक्तीचे करावे ; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रविण ठिपसे यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 6:59 PM
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक असून सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये हा खेळ सक्तीचा करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांनी केले आहे.
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये बुद्धिबळ सक्तीचे करावे ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांचे प्रतिपादन