लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सेंट्रीक फ्युज, सेंटर आॅफ ग्रॅव्हिटी अॅण्ड बॅलेन्सिंग, इंजिन, सिल प्रोजेक्टर या आणि अशा विविध प्रकल्पांचे शनिवारी (दि. ८) सादरीकरण करण्यात आले. विज्ञान प्रबोधिनीतर्फे त्र्यंबकरोड येथील यशवंतराव चव्हाण तारांगण सभागृहात आयोजित या प्रदर्शनात ५० विद्यार्थ्यांनी एकत्र वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण केले.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी संडे सायन्स स्कूल, नाशिक यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘घर्षण शक्तीचे सामर्थ्य’ या अनोख्या प्रदर्शनाचे सादरीकरण करत उद्घाटन करण्यात आले. १५०० पाने असलेल्या दोन पुस्तकांची सगळी पाने एकमेकांवर रचण्यात आली होती. या पुस्तकांच्या पानाने तयार झालेल्या घर्षणाने ओमनी कार आणि क्रेनच्या सहाय्यानेही ही दोन पुस्तके विलग झाली नाहीत, तसेच एकत्र केलेल्या दोन पुस्तकांनी के्रनच्या सहाय्याने कारदेखील उचलली गेल्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅगमेंट रिअॅलिटी, अॅण्ड्राईड मोबाइल अॅप कसे बनवावे आदींबाबत कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, नागरिकांनी या प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून उलगडले विज्ञान प्रदर्शन
By admin | Published: July 09, 2017 1:10 AM