नाशिक : भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीला बदलत्या हवामानाचा आणि ऋतुचक्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दशकांत नापिकीसह दुष्काळ, अवकाळी, पूर यांसह विविध समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागले आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची गरज असून, कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीची शास्त्रोक्त पद्धत पोहोचत असल्याने शेतीचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रधान केंद्र दिंडोरी आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधपारी (दि. २५) कृषी महोत्सवाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी नाईक बोलत होते. व्यासीपठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, मौलवी इतिहाक अहमद, अलिम शेख, स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे आदि उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यापूर्वी रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर आहे; मात्र ते आव्हान पेलण्याची शक्ती येथील संथ परंपरेने दिलेल्या कृषी संस्कृतीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बी-बियाणे, खते, कृषी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तर इस्राईलच्या धरतीवर भारतीय शेती उद्योगाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थानी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)
शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचा जलद विकास
By admin | Published: January 26, 2017 12:30 AM