नाशिक : अणुशक्ती देशाच्या संरक्षणाचे आणि विकासाचे साधन बनली असतानाच याच अणुशक्तीच्या माध्यमातून संशोधन करणारे शास्त्रज्ञ अण्वस्त्रांच्या संहारक स्वरूपाच्या दर्शनाने तत्त्वज्ञ बनले असून, ते शांततेचा उद्घोष करू लागले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले.इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी व एसएमआरके महिला महाविद्यालयात दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या शांतता परिषदेच्या चौथ्या सत्रात गोवारीकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत होते. ते म्हणाले, अण्वस्त्रांच्या संहारक प्रयोगानंतर शास्त्रज्ञांनी त्याची जगावर होणारी संहारक परिस्थिती समोर आणत तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविले. या काळात शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अण्वस्त्रांचा जगाचा विध्वंस करण्याचा रोष पाहता अण्वस्त्र प्रयोगाची चूक लक्षात घेत करारात अडकवणे फायदेशीर ठरविले असून, यानंतरच जागतिक सत्तांचा शांततेचा विचार करण्याची आणि त्यादृष्टीने पावले उचलण्याची वाटचाल सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी म्हणाले, विहित गुणवत्ताधारकांबरोबरच २५ टक्के शिक्षक समाजातील अनुभवाच्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तथा प्रशिक्षणार्थींचा पूर्ण विकास होऊ शकेल. ते परिषदेतील ‘शांतता शिक्षणासाठी युवकांचा संपूर्ण विकास’ या विषयावर बोलत होते. याच विषयावर मंगळवारी एकूण चार सत्रांमध्ये विविध तज्ज्ञांनी भारतीय शिक्षण पद्धतीचा लेखाजोखाच मांडला. डॉ. विनायक गोविलकर यांनी शिक्षण केवळ अर्थार्जनाचे साधन व्हायला नको, तर शिक्षण हे ज्ञानार्जनाची साधना होण्याची गरज व्यक्त केली. अशा ज्ञानार्जनाच्या साधनेतून क्षमतांचे संक्र मण, समर्पण म्हणजे शिक्षण होय, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. शरद खंडेलवाल, प्रा. सपना माथुरे, प्रा. वीणा कुलकर्णी, डॉ. राजश्री कापुरे, डॉ. प्रकाश नेहे यांनी आपले निबंध यावेळी सादर केले. यावेळी डॉ. रूपल सिंग, सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, उपप्राचार्य साधना देशमुख, प्रा. डॉ. मोहिनी पेटकर, डॉ. कविता पाटील, परिषदेचे संयोजक डॉ. विवेक बोबडे, प्रा. सीमा भादुरी, डॉ. एस. आर. खंडेलवाल आदि होते. (प्रतिनिधी)
अण्वस्त्रांच्या संहारकतेने शास्त्रज्ञ बनले तत्त्वज्ञ
By admin | Published: October 26, 2016 12:21 AM