आरटीओमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत आणि क्रीम पोस्टिंग मिळविण्याकरिता तसेच अन्य प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार शहर पोलिसांना प्राप्त झाली. याबाबत उच्च न्यायालयातदेखील संबंधित तक्रारदाराने याचिका दाखल केली आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेमार्फत गुरुवारपासून (दि. २७) चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत तक्रारदारासह दहा शासकीय अधिकारी, दोन खासगी व्यक्तींची चौकशीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप तक्रारीत आरटीओच्या उच्च अधिकाऱ्यांपासून तर थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीकरिता पाच दिवसांची अतिरिक्त मुदतवाढदेखील पाण्डेय यांनी चौकशी अधिकारी उपआुयक्त संजय बारकुंड यांना दिली आहे. दरम्यान, या तक्रारीशी संबंधित आणखी चौदा शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी ७ अधिकाऱ्यांना चौकशीकरिता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याचे बारकुंड यांनी सांगितले.
---इन्फो--
साबळे, कदम यांच्याकडून कागदपत्रे सादर
आरटीओमधील ३ बदल्या, ३ पदोन्नती आणि काही प्रतिनियुक्तीच्या संदर्भात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आज पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी कदम आणि साबळे यांनी यासंदर्भात विविध आदेशांसह अन्य कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली आहेत तसेच तक्रारदार पाटील यांनीही आज पुन्हा काही पुरावे पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी साक्षी पुरावे दाखल करून घेतले आहे. दरम्यान, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी बुधवारी दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली.