लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल कार्यालयाने आलेले शेकडो आधारकार्ड जनतेला घरी न पोहचविता रद्दीत फेकले. परंतु रद्दीवाल्याने हेच शेकडो आधारकार्ड लाभार्थ्यांपर्यंत पोहचवित माणूसकीचे दर्शन घडविले आहे. अतिक शेख यांनी गरिबीतुन तोडक्या पैशावर भंगार व्यवसाय सुरु केलेला आहे. अतिक शेख व राकेश शेजवळ, उमेश शेजवळ यांनी माणूसकी दाखवत ओळखीतल्या नागरिकांना फोन करु न आधारकार्ड वाटप सुरु केलेले आहे. ज्यांची ओळख पटली नाही ते आधारकार्ड त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी बाबासाहेब गिते यांच्याकडे सुपूर्द केले. गिते यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करु न सोशल मिडीयावर प्रसिध्द करु न आधार कार्डबाबत कळविले.वास्तविक पोस्टमास्तर यांनी सदरचे आधारकार्ड हे लाभार्थ्यांना घरपोहच देणे गरजेचे होते. पण सदरचे आधारकार्ड गलथान कामकाजामुळे लाभार्थ्यांऐवजी पोहचले भंगारवाल्याकडे. गोरगरीब जनतेने कामधंदा बुडवुन आधारकार्ड काढलेत. पुन्हा आधारकार्डची आॅनलाईन प्रिंट काढण्यासाठीही आर्थिक भार सोसावा लागलेला आहे. आधारकार्डची सर्वत्र गरज लागत असल्याने लाभार्थी वैतागून गेलेला आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी होवून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांची ईच्छा आहे.
भंगार व्यवसायिकाने घडविले माणूसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 3:07 PM