नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोपरप्रांतीयांच्या ताब्यात असलेला बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी सेनेने केलेल्या प्रयत्नांमुळे दुखावलेले अल्पसंख्याक व याच मतांवर डोळा ठेवून असलेल्या माकपा या दोन्ही पक्षांची प्रभाग क्रमांक २६ मध्ये सरळ सरळ लढत होत आहे. त्यामुळे भंगार बाजार कोणाला तारतो आणि कोणाला मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिडको व सातपूरच्या काही भागाचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २६ हा सध्याचा ४९ व ५० प्रभाग मिळून तयार झाला आहे. प्रभागातील ‘अ’ या सर्वसाधारण गटात माकपाकडून विद्यमान नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, सेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीर, भाजपाचे उखा चौधरी, कॉँग्रेसकडून विठ्ठल विभुते, धर्मराज्य पक्षाकडून अनंत लोहार, राष्ट्रीय समाज पक्षाकडून संजय गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वरकरणी माकपा, सेना, कॉँग्रेस असे तीन पक्षात खरी लढत दिसली तरी, तरी, भंगार बाजार हा एकमेव प्रचारात कळीचा मुद्दा आहे. परंतु हा बाजार उद््ध्वस्त झाल्याने हजारो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जाणार आहे. परप्रांतीयांची एकूण संख्या पाहता तेच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ‘ब’ या सर्वसाधारण महिला गटातून माकपाच्या अॅड. वसुधा कराड, भाजपाकडून डॉ. ज्योती सोनवणे, शिवसेनेच्या हर्षदा गायकवाड, मनसेकडून कामिनी दोंदे, धर्मराज्य पक्षाकडून निर्मला पवार व अपक्ष म्हणून मनोरमा श्रीवास्तव निवडणूक रिंगणात आहेत. वसुधा कराड यांनी यापूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले असून, या गटात माकपाविरुद्ध सेना, भाजपा असे चित्र असेल. भाजपाच्या डॉ. सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती, यंदा त्या भाजपाकडून रिंगणात आहेत. ‘क’ या सर्वसाधारण महिला गटातून भाजपाने माजी नगरसेवक अलका अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. माकपाकडून रेखा खैरनार, शिवसेनेच्या भारती कुशारे, राष्ट्रवादीकडून आश्लेषा पाटील, मनसेकडून लता गोवर्धने, धर्मराज्य पक्षाकडून संगीता अहिरे यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. अलका अहिरे सोडल्या तर सारेच उमेदवार नवखे असून, या गटात भाजपाविरूद्ध सारे पक्ष अशीच लढत रंगणार आहे. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून शिवसेनेचे भागवत आरोटे, भाजपाकडून निवृत्ती इंगोले, मनसेकडून ज्ञानेश्वर बगाडे, राष्ट्रवादीकडून सद्दाम हुसेन अली शेख, राष्ट्रीय समाज पक्षाकडून शमसाद अली मोहम्मद खान, भारिप बहुजन महासंघाचे संतोष वर्मा, अपक्ष सुधाकर जादव, मधुकर जाधव हे आमने-सामने आहेत. सेनेचे भागवत आरोटे हे भंगार बाजार विरोधी कृती समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार भंगार बाजार भोवती फिरणार हे स्पष्ट आहे. या गटात सर्वच नवखे उमेदवार असल्यामुळे निश्चित अंदाज बांधता येत नसला तरी सेना, भाजपा व मनसे यांच्यातच ही खरी लढत आहे.
भंगार बाजार ठरणार तारक की मारक
By admin | Published: February 12, 2017 11:00 PM