नाशिक : जुन्या वादातून टोळक्याने एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात घडली. सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. संशयित हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पवननगर परिसरातील रहिवाशी भगवान मराठे (रा. तोरणानगर, पवननगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मराठे यांचा मुलगा रितेश भगवान मराठे हा सोमवारी (दि.१८) रात्री राजरत्ननगर भागातील गार्डनजवळ गेला होता. यावेळी टोळक्याने त्याला घेरले आणि कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत टोळक्याने काढून त्यास बेदम मारहाण केली. संशयित मोबीन तन्वीर कादरी खान (रा. उपेंद्रनगर), गौरव उमेश पाटील (रा.मानिकनगर), फरहान ऊर्फ फऱ्या-काळ्या जाकीर शेख (रा. राजविहार मागे, साईबाबानगर), दीपक खंडू साळूंके-पारधी व आकाश गणेश कुमावत (रा. दत्त चौक, सिडको) अशी संशयितांची नावे असून दीपक पारधी वगळता अन्य सर्व संशयित हे पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहेत.