नाशिकरोड : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अण्णा हजारे मार्गावर भाजी घेणा-या एका व्यक्तीवर दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याला सराईत गुन्हेगार बाबा शेखच्या खुनाची पाश्वर्भूमी असल्याची जोरदार चर्चा होत असून नाशिकरोड-जेलरोड भागात टोळीयुध्दाचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. हे टोळीयुद्ध रोखण्याचे नाशिकरोड, उपनगर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.एकलहरारोड, मगरमळा येथे राहणारे हुसेनअली उर्फ बबलू मेहबूबअली महमंदअली (54) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी (दि.3) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवर ते भाजी घेण्यास आले होते. त्यावेळी संशयित अक्षय नाईकवाडे, गोविंद संजय साबळे, हुसेन शेख व त्यांचे इतर तीन साथीदार दोन मोटरसायकलवर हुसेनअली यांच्याकडे आले. हुसेनअली यांना हाताने पकडुन अक्षय याने कोयत्याने दोन्ही हातावर वार करुन जखमी केले. झटापटीत हुसेनअली यांच्या नाकाला देखील दुखापत झाली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही घटना भर दुपारी तेदेखील नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर घडल्याने या भागात 'खाकी'चा दरारा संपुष्टात आला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.प्राणघातक हल्ल्याने पांडेय यांचे स्वागतपरिमंडळ-2मध्ये प्राणघातक हल्ल्याने जणू गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे स्वागत केल्याची चर्चा आहे.उपनगर पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त दिपक पांडे यांचा जनता दरबार सुरु असतानाच हा हल्ला घडला. वदर्ळीच्या ठिकाणी पोलीस ठण्यापासून जवळच भर दुपारी हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करण्यापर्यंत मजल गेल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सिन्नरफाटा येथिल सराईत गुन्हेगार बाबा शेख याची डिजीपीनगर ला गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. या खूनातील फरार संशयित टिप्पू हा कुठे हा आहे, अशी विचारणा करुन हुसेन अली यांच्यावर कोयत्याने वार केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यामुळे या हल्ल्याला बाबा खून प्रकरणाची पाश्वर्भूमी असलयाची चर्चा नाशिकरोड भागत सुरु आहे.