उमराणे : कोरोनाचा प्रसार वाढतच असल्याने गावातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून, गावातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसह वाहनांनाही प्रवेशबंदी केली आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना व्हायरसमुळे घ्यावयाची काळजी तसेच पोलीस यंत्रणेकडून लॉकडाउन काळात घराबाहेर बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात वारंवार जंतुनाशक फवारणी केली जात असून, सामाजिक अंतर ठेवण्यासाठी गावातील किराणा, मेडिकल आदी दुकांनासमोर वर्तुळे आखण्यात आली आहेत. येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून, सद्य:स्थितीत बाजार समितीतील खरेदी-विक्र ीचे व्यवहार बंद आहेत. तर दुसरीकडे बहुतांशी शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा काढल्याने विक्र ीसाठी पंचाईत झाली होती.परिणामी स्थानिक व्यापारी दर ठरवून हा कांदा खरेदी करत होते. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले ट्रॅक्टर, माल लोडिंगसाठी ट्रक, कांदा गोण्या भरण्यासाठी मजुरांची वर्दळ बघता लॉकडाउन यशस्वी होत नसल्याने, शिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावाच्या सीमा सील करून कडक स्वरूपात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी झाल्याने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या रक्तदान आवाहनाला उमराणेसह परिसरातील तरु णांसह महिलांनी प्रतिसाद देत ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ग्रामीण रु ग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ लिटर सॅनिटायझर, ५०० ग्लोव्हज, मास्क आदी वस्तू ग्रामीण रु ग्णालयाचे डॉ. दिपक पवार यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाउन काळात शिस्तीचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.- विलास देवरे, माजी सभापती, बाजार समिती, उमराणे