नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधित अत्यल्प होत असतानाही बळींची संख्या सातत्याने अधिक रहात असताना मृत्यूच्या नोंदींमध्ये विलंब होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत होते. मात्र, जिल्हा आणि मनपा प्रशासनाकडून ते मान्य केले जात नव्हते. मात्र, प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत आता भरुन काढली जाऊ लागली असल्यानेच गुरुवारी पोर्टलवर तब्बल २७० बळींची नोंद करण्यात आली आहे. या नोंदीतील विलंबाबाबत तांत्रिक त्रुटींच्या कारणांचा खुलासा देऊन जिल्हा शल्यचिकित्सकांकडून ही मोठी चूक मान्य करण्यात आल्याने अखेर कोरोना बळींच्या नोंदीतील घोळावरच शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी गुरुवारी केलेल्या खुलाशात दुसऱ्या लाटेत सर्वच रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतानाच फॅसिलिटी ॲप कार्यान्वित न होणे, इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णांचा आयसीएमआरआयडी वेळेत प्राप्त न होणे, डाटा एंट्री करणारे कुशल मनुष्यबळ आजारी पडणे, मनुष्यबळाची अनुपलब्धता यासारख्या अनेक बाबींमुळे काही रुग्णालयांमार्फत मागील काही महिन्यात झालेले काही मृत्यू पोर्टलवर अपलोड केले गेले नव्हते. त्याबाबत वेळोवेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित स्थानिक यंत्रणांना सूचित करण्यात आले होते. वेळोवेळी यंत्रणेमार्फत पाठपुरावा करुन खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना पोर्टलवर मृत्यू संख्या अद्ययावत करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली होती. त्यामुळेच आता पोर्टलवर दैनंदिन मृत्यू अपलोड होण्याच्या संख्येत वाढ झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पाठविण्यात आलेल्या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
मृत्यू दर थेट १.३९ टक्क्यांवर
गत दोन दिवसात जिल्ह्यात केवळ १० मृत्यू झाले आहेत. त्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३ तर ग्रामीणला ६ आणि जिल्हाबाह्य १ अशी मृत्यूसंख्या आहे. तर, गत काही महिन्यातील विविध रुग्णालयांमधील २६० बळींची नोंद मृत्यू पोर्टलवर अपडेट करण्यात आली आहे. या सर्व बळींचा समावेश जिल्ह्याच्या एकूण बळींमध्ये करण्यात आलेला आहे . त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६७, नाशिक ग्रामीणचे ९१, मालेगाव मनपा क्षेत्रातील २ तर जिल्हाबाह्य १० मृत्यूंचा समावेश आहे. या वाढीव मृत्यूमुळे जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर १.३१ टक्क्यांवरुन थेट १.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
इन्फो
मृत्यूसंख्या अपडेट करणे सुरुच राहणार
शासकीय आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करीत असताना पोर्टलवर मृत्यूसंख्या अपडेट करण्याची ही प्रक्रिया अजून काही दिवस सुरुच राहणार असल्याचेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अजून अशाच प्रकारच्या मोठमोठ्या आकड्यांची बळीसंख्या येत राहणार असल्याचेच संकेत देण्यात आले आहेत. त्यामुुळे पुढील काही दिवसात यापेक्षाही मोठे आकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन्फो
नवीन ३०७ रुग्ण
जिल्ह्यात गुरुवारी एकूण रुग्ण संख्येत ३०७ ने वाढ झाली आहे.त्यात २०० रुग्ण नाशिक ग्रामीणचे , ९७ रुग्ण नाशिक मनपाचे ७ जिल्हाबाह्य तर ३ मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत. तर १२० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पोर्टलवर गुरुवारी एकूण २७० बळी नोंदविले गेल्याने एकूण बळींच्या संख्येत मोठी वाढ होऊन ही संख्या तब्बल ५३७३ वर पोहोचली आहे.