लोहोणेर : जनता करफ्यू सुरू असतानाही काही किराणा दुकानदारांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपापली दुकाने सुरूच ठेवल्याने कोरोना नियंत्रण समितीच्यावतीने पाच विक्रेत्यांची दुकाने सीलबंद करण्यात आली आहेत.कोविड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लोहोणेर गावात झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजना भाग म्हणून कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर वाढती रुग्ण संख्या विचारात घेता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. कारण गृह विलगीकरणात असलेले कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे गांव पातळीवर संस्थात्मक विलगीकरणासाठी लोहोणेर येथील जनता विद्यालयातील काही खोल्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायत सभागृहात कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत हा निर्णय कायम ठेवण्यात आला असून गावातील दिवसेंदिवस वाढतच चाललेली रुग्ण संख्या कमी करण्यासाठी व कोरोना साखळी तुटण्यासाठी तसेच काही रुग्ण बाधित असतानाही गृह विलगीकरणात न राहता बिनधास्तपणे गावात सर्वत्र फिरतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
याला कुठेतरी अटकाव घालावा म्हणून येथील जनता विद्यालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय कोरोना नियंत्रण समितीच्यावतीने घेण्यात आला. बैठकीस कोरोना नियंत्रण समितीचे योगेश पवार, रमेश आहिरे, पंडित पाठक, प्रसाद देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, दीपक देशमुख, समाधान महाजन, यशवंत जाधव, प्रभाकर आहिरे, नाना जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश निकुंभ, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पोलीस पाटील अरुण उशीरे उपस्थित होते.