नाशिक : इगतपुरीमध्ये रंगलेल्या हायप्रोफाइल हवाइयन थीमवरील रेव्ह पार्टी रंगलेल्या स्काय ताज व स्काय लगून व्हिला आणि स्काय वॉटर या तीन बंगल्यांसह रणवीर सोनी याने भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी घेतलेला अजून एक, असे एकूण तीन बंगले नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘सील’ करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील स्काय ताज आणि स्काय लगून व्हिला या दोन आलिशान बंगल्यांमध्ये अभिनेत्री हिना पांचलसह बॉलिवूड व दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले कलाकार, कोरिओग्राफर असे एकूण २२ तरुण-तरुणी एकत्र येत दारू, हुक्का, गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करत ‘हवाईयन थीम’च्या रेव्ह पार्टी करत होते. या दोन ते तीनदिवसीय पार्टीची कुणकुण पोलिसांना लागताच मध्यरात्री अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी साध्या वेशात फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत दुसऱ्याच दिवशी पार्टी उधळून लावली होती. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात ड्रग्ज पुरविणाऱ्या नायजेरियन उमाही पीटर यासह व्यावसायिक संशयित पियुष सेठीया आणि सात संशयितांविरुध्द पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य व मन:प्रभावित पदार्थ अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच हिना पांचालसह अन्य सर्वांविरुध्द पोलिसांनी कोटपा, दारूबंदी कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बंगलामालक संशयित रणवीर सोनी यांनाही या प्रकरणात पोलिसांनी मुंबईतून अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. जे बंगले सोनी यांनी सुमारे १ लाख १४ हजार रुपये इतक्या रकमेवर दोन दिवसांसाठी रेव्ह पार्टीकरिता भाडेतत्त्वावर दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी चौकशीत माहिती घेत सोनी यांच्या मालकीच्या दोन बंगल्यांसह त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेला एक बंगला असे तीन बंगले पोलिसांनी सील केले आहेत.
--इन्फो--
हिना पांचाल आज पुन्हा न्यायालयात
रेव्ह पार्टीप्रकरणी मंगळवारी (दि. ३०) २५ संशयितांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यामध्ये हिना पांचालसह अकरा महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपणार असल्याने त्यांना पोलिसांकडून पुन्हा इगतपुरीच्या न्यायालयात आणले जाणार आहे. ही रेव्ह पार्टी हिनाला चांगली भोवली असून बिग बॉसच्या घरातील पाहुणचार अनुभवणाऱ्या हिनाला मात्र या प्रकरणात आठवडाभराचा लॉकअप भोगावा लागला आहे. दरम्यान, सोमवारी न्यायालय काय निर्णय देईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.