नाशिक : विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून आणलेल्या मुहूर्ताच्या कांद्यास सर्वोच्च ५,१५१ रुपये भाव मिळाला. दरम्यान, चालू वर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांद्यांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यांच्या दरात तेजी राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर नवीन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. त्या रिवाजाप्रमाणे यावर्षीही सकाळी ११ वाजता नवीन लाल कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कांदा व्यापारी रामराव खंडेराव देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत ५ हजार १५१ रुपये दराने नवीन लाल कांदा खरेदी केला. चालू वर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांद्यांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. असेे असतानाच लागवड झालेल्या कांद्यांनाही नंतरच्या पावसाने झोडपल्याने हे कांदे मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. त्यामुळे बाजारात नवीन लाल कांद्यांची कमी आवक झाली आहे. बाजार आवारात ५ बैलगाड्या, ५० पिकअप व १४ ट्रॅक्टर आदी वाहनांतून सुमारे एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीतकमी ११०० रुपये, जास्तीतजास्त ५,१५१ रुपये, तर सरासरी भाव २१०० रुपये इतका होता.
इन्फो
उन्हाळदरात तेजीच
आगामी काळात बाजारात लाल कांद्यांची किती आवक होते, यावरून शेतकरी बांधवांनी चाळीत साठवून ठेवलेला परंतु काही अंशीच शिल्लक असलेल्या उन्हाळ (गावठी) कांद्यांचे दर अवलंबून असून सध्या तरी लाल कांद्यांची आवक महिनाभर वाढेल, अशी अपेक्षा नसल्याने उन्हाळी कांद्यांचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता येथील कांदा व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.