कोरोनाकाळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताणतणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
पहिल्या घटनेत आर्टिलरी सेंटर रोडवर राहणारी १४ वर्षाची मुलगी हरवली होती. तिच्या आईने २० एप्रिलला उपनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. तक्रारीत म्हटले होते की, १९ एप्रिलला रात्री घराजवळील साईकिरण दुकानातून काडीपेटी घेऊ येते, असे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लाऊन पळवून नेले असे तक्रारीत म्हटले होते. मुलीस फूस पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल केला होता. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस गायकवाड, बहिरट आदींचे पथक तयार करण्यात आले होते. ही मुलगी मुंबई नाका येथील रुग्णालयात असल्याचे समजले. पोलीस तेथे गेल्यावर ही मुलगी जत्रा हाॅटेलसमोरील अपार्टमेन्टमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. नंतर पालकांच्या ताब्यात दिले.
दुसऱ्या घटनेत जयभवानी रोडवरील पंधरा वर्षांची मुलगी बेपत्ता होती. तिचे पालक पंचवटीत देवदर्शनासाठी गेले होते. घरी परतल्यावर आपली मुलगी त्यांना दिसली नाही. शोध घेऊनही ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलीस गणपत काकड, मधुकर दावले आदींनी शोध घेतला असता ही मुलगी भिवंडी बसस्थानकावर असल्याचे समजले. तेथे जाऊन तिला पोलिसांनी आणले. नंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. कोरोना काळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताणतणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.