सटाणा : शहरातून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून बेपत्ता असलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा तपास लावण्यात यश आले आहे. सोमवारी (दि. १३) सायंकाळपासून सटाणा बसस्थानकापासून सुरू झालेल्या थरारक घटनेचा शेवट पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकात झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह सटाणा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सटाणा शहरात राजमाता अहिल्याबाई चौकात राहणारी व जिजामाता हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी सोमवारी सायंकाळी घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती न मिळून आल्याने सटाणा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली. एकीकडे पोलिसांनी तपास सुरू केला तर तिच्या नातेवाइकांनीदेखील शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला.
सोमवारी सायंकाळी ती सटाणा बसस्थानकात प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागताच बसस्थानकाच्या फलाटालगत असलेले फुटेज तपासले असता संबंधित बेपत्ता मुलगी सायंकाळी ७ वाजता सुटणाऱ्या सटाणा-मालेगाव बसमध्ये बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्याने तिच्या नातेवाइकांनी मालेगाव गाठत तेथील दोन्ही बसस्थानकांचे रात्री आठ ते साडेआठ दरम्यानचे सीसीटीव्ही तपासले असता संबंधित मुलगी मालेगावहून पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसले.
------
कारण अस्पष्ट
सटाणा बसस्थानकातून मालेगाव बसस्थानक व तेथून पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये ती बसल्याचे समजताच तिच्या नातेवाइकांनी नाउमेद न होता पुण्याचे शिवाजीनगर बसस्थानक गाठले. शिवाजीनगर बसस्थानकात परिसरात तिचा सर्वत्र शोध घेतला असता शेवटच्या फलाटावरील कोपऱ्यात संबंधित बेपत्ता मुलगी मिळून आल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला ताब्यात घेतले. मात्र तिने घरातून निघून जाण्याचा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.