नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग आला नाही म्हणून जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मेक इन इंडियाची प्रेरणा घेऊन नाशिकच्या ब्रँडिंगसाठी निमातर्फे मेक इन नाशिक प्रकल्प राबविण्यात आला. तरीही फारसा उपयोग झालेला नाही. मात्र केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन आॅफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स’तर्फे २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या टेक्नॉलॉजी सेंटरसाठी १६ एकर जागेची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. नवीन वर्षासाठी ही शुभ वार्ता समजली जात आहे. या प्रकल्पामुळे उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नाशिकला मोठा उद्योग प्रकल्प यावा म्हणून जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड असोसिएशन (आयमा), महाराष्ट्र चेंबर्स यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. वातावरण निर्मितीसाठी आणि नाशिकचे ब्रँडिंग करण्यासाठी मेक इन नाशिकच्या धर्तीवर निमातर्फे मुंबईत तीनदिवसीय मेक इन नाशिक प्रकल्प राबविण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारच्या व्हायब्रन्ट महाराष्ट्र उपक्रमात निमाने पूर्ण क्षमतेने सहभाग नोंदविला होता. केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. राज्यातील मागील पाच वर्षांतील शिवसेना-भाजप युतीच्या काळात यश मिळू शकले नाही. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आतातरी नाशिकला मोठा प्रकल्प येण्याची शक्यता औद्योगिक वर्तुळात वर्तवली जात आहे.