अमोल अर्जुन थोरात (३२, रा. पंचाळे) यांची अभिजित कंपनीची निळ्या रंगाची ८० हजार रुपये किमतीची ट्रॉली शेतात विहिरीचे काम चालू असल्याने त्या ठिकाणी लावली होती. सदर ट्रॉली दोन ते तीन दिवस उभी असल्याचे हेरून गेल्या बुधवारी (दि.९) मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती. अमोल थोरात यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अज्ञात आरोपी व ट्रॉलीच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांची पथके तयार केली. त्यानुसार हवालदार गोरक्षनाथ बलक, रामचंद्र भवर, गौरव सानप, बालाजी सूर्यवंशी यांनी रात्रभर आरोपीचा व चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी सापळा रचत संशयित चेतन बाळू आसकळ (२२, रा. पंचाळे) यात ताब्यात घेतले. तसेच मुख्य सूत्रधार विशाल साहेबराव तुपसुंदर (रा. पंचाळे) हा संशयित पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जी. डी. बलक पुढील तपास करीत आहेत.
इन्फो
मित्रांच्या मदतीने चोरी
चेतन याची पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने मी माझ्या मित्राच्या मदतीने रात्रीच्या सुमारास ट्रॉली चोरून नेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा अमित आत्माराम पवार, (२३), विनोद अनिल पवार (२२, दोघे रा. पंचाळे) या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरलेली ट्रॉली व चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर पोलिसांनी हस्तगत केला.