नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका यंदाच्या हंगामात सुरू होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. नासाका कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने गावोगावी फिरून ऊसलागवडीसाठी केलेले आवाहन व देण्यात येणारा भाव यामुळे शाश्वत पीक म्हणून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड दमदार झाली आहे. नासाका सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणांमुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्याप्रमाणे नासाकाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून, नोव्हेंबर व डिसेंबरदरम्यान बाहेरील कारखान्यांनी अवघी ८० हजार मेट्रिक टन ऊसतोड केली आहे. तसेच संगमनेर, प्रवरा आदी कारखान्यांचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी शेतकºयांकडून जादा पैशांची आकारणी करीत आहे. चालू वर्षी जिल्हा बँकेने शेतकºयांना कुठलाही कर्जपुरवठा केला नाही. इतर जिल्ह्यांतील ९ कारखान्यांनी उर्वरित उसासाठी जानेवारी महिन्यात आपापल्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नासाका कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊसतोडीसाठी आखडता हात घेतल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:35 AM