लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : निसर्गातील विविध भाव-भावनांचे प्रतिबिंब आपल्या दर्जेदार, अभिजात लेखनातून करणार्या दुर्गा भागवत व अरुण ढेरे यांच्या ऋतुचक्र व रूपोत्सव यापुस्तकातील निवडक भागांच्या ऑनलाइन अभिवाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. इथल्या संस्कृती, परंपरांचा सारांश असलेला सण, उत्सव यांची अत्यंत तरल आणि तितकेच सुरेख दर्शन या अभिवाचनातून समोर आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपर्णा क्षेमकल्याणी व सई-मोने पाटील यांच्या तितक्याच संवादी अभिवाचनाने ऋतुस्पर्श हा कार्यक्रम खूपच रंगतदार ठरला. निसर्गातील पाने फुले, निसर्गाचे बदलणारे विभ्रम यांच्याशी प्रत्येकाचे नाते असते त्यातूनच जीवन व्यवहार, मनाचा आनंददायी सोहळा साजरा होतो. यांचे विलोभनीय दर्शन त्यांनी घडवले. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना प्रतिष्ठानाचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक-सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्याचा विचार आजही दिशादर्शक असल्याचे सांगितले.
फोटो
१४ अभिवाचन
दुर्गा भागवत व अरुण ढेरे यांच्या ऋतुचक्र व रूपोत्सव या पुस्तकातील निवडक भागांच्या ऑनलाइन अभिवाचनाप्रसंगी अपर्णा क्षेमकल्याणी व सई-मोने पाटील.