नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी (दि.२९) सुटीच्या दिवशी उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खास आदेश काढत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, परंतु तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रविवार सुटीचाही दिवस कोरडा गेला. महापालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यंदा आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी मौनी अमावास्येमुळे उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी पूर्व विभागातून दोन, तर पंचवटी विभागातून एक याप्रमाणे एकूण तीन अर्ज दाखल झाले. राज्य निवडणूक आयोगाने अगोदर घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. परंतु विविध राजकीय पक्षांच्या मागणीनुसार आयोगाने त्यात बदल करत रविवारी सुटीच्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, रविवारी सुटीच्या दिवशी एकही उमेदवार निवडणूक कार्यालयांकडे फिरकला नाही. सहाही विभागात रविवार निरंक राहिला. आतापर्यंत पूर्व विभागात प्रभाग क्रमांक १४ मधून दोन, तर पंचवटीतून प्रभाग क्रमांक २ मधून एक अर्ज दाखल झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या याद्या अद्याप घोषित न झाल्याने एकही पक्षाकडून उमेदवाराने अधिकृतपणे अर्ज दाखल केलेला नाही. सोमवारी (दि.३०) राजकीय पक्षांचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता असून, त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. (प्रतिनिधी)
सण्डे ठरला ‘ड्राय डे’
By admin | Published: January 29, 2017 10:34 PM