नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे. या भूमिकेवर समाज ठाम असून, या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन समाजाने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये २१ जूनला करण्याचा निर्धार केला आहे.
नाशिक सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची नाशिक जिल्हा बैठक शुक्रवारी (दि. १८) औरंगाबाद रोड, वरद लक्ष्मी मंगल कार्यालय येथे झाली. यावेळी नाशिक येथे २१ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजता रावसाहेब थोरात हॉलजवळील मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांचा नेतृत्वाखाली मूक आंदोलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून, या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजासह आरक्षणास पाठिंबा देणारे सर्व समाजघटक उपस्थित राहाणार असल्याचे स्पष्ट करतानाच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात उपस्थित राहून आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट करीत आरक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांनी स्वयंशिस्त पाळूत कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अनादर होणार नाही, घोषणाबाजी होणार नाही याची खबरदारी घेत मूक आंदोलन करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान, सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुणे येथील लालमहाल ते मुंबईत विधानभवन लॉंग मार्च होणार असून, पहिल्या टप्प्यात आंदोलन होणाऱ्या त्याच जिल्ह्यांमध्ये लाँग मार्चसंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीला मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले, आमदार सीमा हिरे, दत्ता गायकवाड, शिवाजी सहाणे, शिवाजी चुंबळे, माजी आमदार जयंत जाधव, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, चेतन शेलार, सचिन पिंगळे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, संजय फडोळ, शिवा तेलंग, मधुकर कासार, माधवी पाटील, पूजा धुमाळ, पूनम पवार, योगेश कापसे, मामा राजवाडे, बंटी तिदमे, सुदाम ढेमसे, अनिल ढिकले आदी उपस्थित होते.
--
मराठा समाजाच्या मागण्या
- राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी.
- मराठा आरक्षणासाठी राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा.
- ‘सारथी’ संस्थेची स्वायत्ता अबाधित राखून सर्व महसुली विभागात कार्यालये व प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्रे सुरू करावीत.
- पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह वाढ करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.
- आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी जागा निर्माण कराव्यात.
- कोपर्डी प्रकरण स्वतंत्र जलदगती न्यायालयात चालवून दोषींना शिक्षेचा विषय तात्काळ निकाली लावावा.
---
काळ्या रंगाची वेशभूषा
मराठा समाजाच्या बैठकीत सोमवारी (दि. २१) होणाऱ्या आंदोलनाची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली. त्यानुसार सर्वांनी काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून यावे, आंदोलनस्थळावर नो मास्क, नो एन्टी नियम असून, प्रत्येकाने काळा मास्क वापरण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत.
--
..असे होईल आंदोलन
९.०० महाराष्ट्रातील सर्व समन्वयक आंदोलनस्थळी पोहोचतील.
९,५० समन्वयक, नोकरभरतीची मुले आणि लोकप्रतिनिधी स्थानापन्न होतील.
१०.०० छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजन
१०.१० लोकप्रतिनिधींकडून भूमिका मांडण्यास सुरुवात होईल.
१.०० राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.
१.१५ महाराष्ट्रातील समन्वयक आणि जिल्हा समन्वयकांसोबत लाँग मार्चसंदर्भात बैठक.
===Photopath===
180621\18nsk_34_18062021_13.jpg
===Caption===
मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना शिवाजी सहाणे