सिन्नर: तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. आजपासून हे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित झाले. संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांना या कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात १५० रुग्णांची क्षमता असून त्यातील ७ दालने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक तसेच इतर कन्सल्टींगसाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता ३० ने घटली असून ती १२० वर आली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडू शकते त्यामुळे प्रशासनाने पर्यायी कोवीड केअर सेंटरच्या उभारणीसाठी चाचपणी सुरु केली. यापुर्वी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. त्यामुळे याच ठिकाणी नवीन कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी १०० खाटांची व्यवस्था असून आवश्यकता भासल्यास आणखी ५० खाटा वाढवण्यात येणार आहे. तहसिलदार राहूल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, यांच्यासह पंचायत समिती, नगरपरिषद व तहसील कार्यालयाच्या अधिर्कायांनी या कोविड केअर सेंटरची पाहणी करुन आवश्यक त्या साधन सामग्री उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. मंगळवारी रोटरी क्लब आॅफ सिन्नर यांच्यातर्फे आर.ओ. मशीन व दोनशे चादरी या कोवीड केअर सेंटर साठी देण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
इंडिया बुल्स येथे दुसरे कोवीड केअर सेंटर सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:45 PM