नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित संख्या दीडशेहून कमी आल्याने एकुणात नवीन बाधितांची संख्या निश्चितपणे घटू लागल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.२०) एकूण ५ बळी गेले असून पोर्टलवर २३५ जणांचे मृत्यू अपडेट करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शनिवारी ११४, तर रविवारी १३६ असे सलग दोन दिवस कोरोनाबाधितांची संख्या दीडशेखाली राहू लागल्याने यंत्रणेलादेखील काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. शनिवारच्या १३६ रुग्णांपैकी ७० नाशिक मनपा क्षेत्रातील, ६५ नाशिक ग्रामीणचे तर जिल्हाबाह्य १ असे बाधितांचे प्रमाण आहे, तर २२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान पोर्टलवर अपडेट करण्यात आलेल्या २३५ बळींपैकी नाशिक मनपा क्षेत्रातील बळीसंख्या १५२, तर नाशिक ग्रामीणची ८३ आहे. पोर्टलवर अपडेट करण्यात आलेल्या बळींमुळे आतापर्यंत एकूण बळीसंख्या ७९६६वर पोहोचली आहे. तर उपचारार्थी रुग्णसंख्या २४९०पर्यंत खाली आली आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्या पाचशेहून कमी होऊन ४८५वर आली आहे, तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.३४वर पोहोचले आहे. मावळत्या आठवड्यात रुग्णसंख्येत तसेच उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकणार आहे.