चांदवड : येथील एसएनजेबी संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या टीम एव्हेंजर्सने बनविलेल्या अल्ट्रॉन १.० या ग्रीन कारने एल.डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, अहमदाबादच्या आवारात घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील इको ग्रीन व्हेईकल चॅलेंज ३५ हजार (इजीव्हीसी १९) या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक व रोख दहा हजार रुपये पटकावले. तसेच डिजाईनमध्ये प्रथम व रु पये दहा हजार, इनोव्हेशनमध्ये प्रथम व रु. दहा हजार व कॉस्ट आणि बिजनेसमध्ये द्वितीय असे एकापाठोपाठ एक पारितोषिक मिळवून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली. टीम एव्हेंजर्स या संघामध्ये कर्णधार व डिजाईन हेड स्वरूप सोनवणे, रायडर श्रीरंग सोनवणे व कल्पेश शिंदे, इनोव्हेशन अभिजित काळे यांसह दहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना प्रा. पी. डी. बागमार यांचे मार्गदर्शन लाभले. अल्ट्रॉन १.० या ग्रीन कारने इजीव्हीसी -१९ तर्फे घेण्यात आलेल्या स्टॅटिक, डायनामिक, सेफ्टी टेस्ट उत्तमरीत्या पार करीत हे पारितोषिक पटकावले. कारचे सर्व मॅन्युफॅक्चरिंग व डिझायनिंग ही सर्व कामे महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्येच पूर्ण केली. यासाठी अधिक्षक प्रा. जे. एस. पगार व वर्कशॉपमधील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर यशाबद्दल प्रबंध समिती अध्यक्ष बेबीलाल संचेती, अभियांत्रिकी समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. कोकाटे, यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती तसेच विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:51 PM