लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गतवर्षी कोरोनामुळे प्रथमच ऑनलाईन स्वरूपात झालेल्या ‘चेस ऑलिम्पियाड’ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करून विजेतेपद मिळवून देण्याची देदीप्यमान कामगिरी नाशिकच्या विदीत गुजराथीने करून दाखवली होती. तर गत महिन्यात झालेल्या ‘वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप’मध्ये उपांत्यपूर्व फेरी म्हणजे जगातील अव्वल ८ खेळाडूंमध्ये खेळण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारा विदीत हा आनंदनंतरचा भारतातील केवळ दुसरा बुद्धीबळपटू ठरला असून त्याच्या कामगिरीने भारतासह नाशिकची मान बुद्धीबळाच्या क्षेत्रात अधिकच उंचावली असून बुद्धीबळाच्या क्षेत्रात भविष्यातील देशातील अव्वल क्रमांकासह जागतिक अव्वल १० बुद्धीबळपटूंमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेेने विदीतची घोडदौड सुरू आहे.
भारतात बुद्धीबळ म्हणजे विश्वनाथन आनंद एवढीच ओळख गत दशकाच्या मध्यापर्यंत होती. मात्र, गत दशकाच्या उत्तरार्धात नाशिकच्या विशीतल्या युवकाने ग्रॅंडमास्टरपासून थेट भारताचा चौथा सुपर ग्रॅंडमास्टरपर्यंतची वाटचाल केली. देशात आनंदनंतरचे द्वितीय मानांकन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील अव्वल ३० बुद्धीबळपटूंपर्यंतदेखील त्याने धडक मारली. त्यानंतर गतवर्षीच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये तर आनंदने कप्तान पदासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने भारताच्या अव्वल बुद्धीबळपटूंचे नेतृत्व करण्याची संधी ऐनवेळी विदीतला मिळाली. तरीही विदीतने भारताला रशियासारख्या दिग्गज देशासह संयुक्त विजेतेपद मिळवून दिले होते. थेट पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी विदीतचे कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर गत महिन्यातील ‘वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप’मध्ये विदीत ज्या पोलंडच्या दुदाकडून तो उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. तो दुदाच नंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. म्हणजे पराभवदेखील विश्वविजेत्याकडून अशी त्याची देदीप्यमान कामगिरी होती. जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या विदीतची वाटचाल विश्वातील अव्वल १० बुद्धीबळपटूंकडे सुरू झाल्याचेच दर्शवित आहे.
इन्फो
प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार कधी ?
भारताचे नेतृत्व करून जागतिक विजेतेपद, भारतातील द्वितीय, जगातील अव्वल वीस बुद्धीबळपटूंमध्ये स्थान इतकी देदीप्यमान कामगिरी करूनही विदीतला देशातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे अजून नक्की काय केले की विदीतला अर्जुन पुरस्कारासारखा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा सन्मान मिळेल, असा सवाल मात्र क्रीडा आणि बुद्धीबळप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे.
फोटो
२८विदीत