नाशिक : यावर्षी भाऊ किंवा वडील मुराळी म्हणून येईल आणि आपल्याला माहेरी घेऊन जाईल या वेड्या आशेवर अनेक सासुरवाशिण महिला आखाजीच्या पंधरा-वीस दिवस आधीपासून माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती यायची, मोठ्या आनंदाने माहेराला न्यायची. मग सुरू व्हायचा मौज, मस्ती, गाणी आणि आठवणींचा सिलसिला. मात्रए दुर्दैवाने, या आनंदावर कोरोनाच्या वैश्विक महामारीने सलग दुसऱ्या वर्षी विरजण फिरविल्याने महिलावर्गातून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय तृतीया हा सण खान्देशासह नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा रिवाज आहे. ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला ह्यआखाजीह्ण असे नाव प्रचलित आहे. आखाजीच्या पंधरा दिवस आधीपासून सगळीकडे लहान मुली, सासुरवाशिणी तसेच महिला यांच्या तोंडून झोक्यावरची गौराईची गाणी ऐकू येऊ लागतात. या आनंदात सहभागी होण्यासाठी सासरी असलेल्या विवाहितांना माहेरी येण्याचे आठ-दहा आधीच वेध लागायचे. जसजशी आखाजी जवळ यायची तसतशी तिचे मन माहेर परिसरात घिरट्या घालायचे. शरीराने ती सासरी आणि मनाने माहेरी असायची. एकदाचा कोणी मुराळी घेऊन गेला की माहेर परिसरातील वाटाही माहेरवाशिणींच्या सहवासाने बोलू लागायच्या. गल्लीबोळात माहेरवाशिणींच्या उपस्थितीने आनंदाला उधाण यायचे. चार मैत्रिणी जमायच्याण सासर-माहेरच्या आठवणीत रमायच्याण झोक्यावर बसून ह्यआथानी कैरी तथानी कैरी हिंदळा (झोका) खाय वं , कैरी हिंदळा खाय तठे कसाना बजार वंह्ण अशी आखाजीची गाणी लयीत गायच्याण नदीकाठावर जाऊन दुसऱ्या काठावरील मुलींशी भांडायच्या. परंतु ते भांडण प्रेमाचे असायचेण त्याला परंपरेची किनार असायची. या सर्व गडबड, गोंधळ, दंगा-मस्ती व गाण्यांमुळे सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित व्हायचे. माहेराच्या घराचे गोकुळ व्हायचे. मागील वर्षापासून कोरोनाची महामारी आली आणि सर्व आनंदावर पाणी फिरवून गेली. त्यामुळे सासुरवाशिणी माहेराच्या भेटीपासून वंचित राहिल्या. तरीदेखील या महिलावर्गाकडून कोरोनाची ही साथ लवकर संपुष्टात येवो आणि पुढच्या वर्षी हा आनंद अपूर्व उत्साहात साजरा करायला मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उन्हाळा लागला की महिला वर्गाला अक्षय तृतीया (आखाजी)चे वेध लागतात. सासुरवाशिणींना माहेरी जाण्यासाठी हा हक्काचा सण आहे. दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे महिलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. महिलांना मुला - बाळांसह माहेरी जाता येत नसल्यामुळे हिरमोड होत आहे. आखाजीचा झोका, संगीताचा कार्यक्रम, आप्तेष्ट नातेवाईकांची भेट कोरोनामुळे दुरावली आहे. यंदाचा सणदेखील काळजी घेऊन साजरा करावा लागेल.- स्नेहल राहुडे, मालेगावग्रामीण भागात अक्षय तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. माहेरवाशिण महिला भाऊबीजेनंतर अक्षय तृतीयेच्या सणाला माहेरी जाऊन वेगळाच आनंद लुटतात. अनेक दिवसांनी बालपणीच्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात. झिम्मा-फुगडी खेळणे, गप्पा मारण्यात ते दिवस आनंदात जायचे. या सणाला आमरस आणि पुरणपोळीला विशेष महत्त्व असते. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लॉकडाऊन होते. यंदा तरी हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा होतीण अखेर तीही मावळली आहे.- डॉ. सारिका डेर्ले, सायखेडा, ता. निफाड(१३सारीका डेर्ले)कसमादे पट्ट्यात अक्षय तृतीया या सणाला ह्यआखाजीह्ण म्हणून संबोधले जाते. या भागातील महिलांचा हा एक आगळावेगळा आनंददायी सण आहे. या सणाला सर्व सासुरवाशिणी मैत्रिणी आखाजीला आपल्या माहेरी आठ-दहा दिवस आधीच यायच्या. झोक्यावर बसून अहिराणी भाषेतील गौराईची गाणी गायच्या. त्यामुळे एक मंगलमय वातावरण निर्माण व्हायचे. घरोघरी गौराईची स्थापना केली जायची आणि दररोज महिला, मुली पूजा करून आम्ही मैत्रिणी झोक्यावर बसून ह्यआथानी कैरी तथानी कैरी, कैरी हिंदळा खाय वंह्ण असे गाणे गायचो. याचकाळात ग्रामदैवत जगदंबा मातेचा साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवाची सांगताही आखाजीच्या दिवशीच व्हायची. देवीच्या मिरवणुकीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आनंद लुटायच्या. मात्र, मागील वर्षापासून कोरोनामुळे या मंगलमय सणाच्या आनंदाला आम्ही पारखे झालो आहोत.- ॲड. छाया शिरसाठ, मेशी, ता. देवळापेठ तालुक्यात अक्षय तृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. घराघरात माहेरवाशिणी गौराईची स्थापना करतात. आखाजीच्या दिवशी पारंपरिक वाद्य व नृत्याच्या तालावर मिरवणूक काढून नदीवर बोळपण केली जाते. माझे सासर कायरे सादडपाडा असून माहेर उस्थळे येथील आहे. मागील वर्षापासून कोरोना व लॉकडाऊनमुळे आखाजीचा सण साजरा करता येत नाही. आखाजीला माहेरी गेल्यावर बालपणापासून तर शाळा महाविद्यालयातल्या सर्व मैत्रिणींची भेट होत असे. कोरोनामुळे या प्रेमळ भेटी दुरावल्या आहेत.- सुनंदा भुसारे, पेठसासुरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारा सण म्हणून अक्षय तृतीया ओळखली जाते. अक्षय तृतीयेचा संबंध सासर-माहेरच्या ऋणानुबंधाशी जोडला गेला आहे. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. माहेरच्या आपल्या माणसांत आठ, दहा दिवस राहून सासरी केलेल्या श्रमाचा परिहार होतो व पुन्हा नवीन उमेद, जगण्याचे बळ घेऊन सासरी येते. सासर कितीही श्रीमंत असले तरी दरवर्षी अक्षय तृतीयेची प्रतीक्षा असते. सर्वच सासुरवाशिण महिला माहेरी नेण्यासाठी भाऊ-वडील कुणी तरी येईल म्हणून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या असतात. कोरोनामुळे नगर जिल्ह्यात असलेल्या माझ्या माहेरी दीड वर्षापासून जाणे झाले नाही. यामुळे सासरी थोडी मानसिक ओढाताण होणे स्वाभाविक आहे. यंदादेखील कोरोनामुळे माहेरी जाणे शक्य होणार नसल्यामुळे मनाला हुरहूर लागली आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ह्यया तिथीस केलेले दान, त्याग व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. म्हणून यंदाच्या आखाजीला केलेला हा त्याग नक्कीच कोरोनाचा नायनाट करेल असा सकारात्मक विचार करून सासरीच सुरक्षित राहूया.- डॉ. प्रियांका सूर्यवंशी, देवळाखान्देशात आखाजी या सणाला दिवाळीसारखे अनन्यसाधारण महत्त्व आणि एक मायेचा ओलावाही आहे. आखाजीला विवाहित महिला माहेरी येतात. आपल्या मैत्रिणींसोबत झिम्मा फुगडी, झोके घेऊन गाणी म्हणतात. पुरणपोळी, आमरसाचे जेवण माहेरी आलेल्या आपल्या लेकीसाठी आई प्रेमाने बनविते. सासरची दु:खे, बंधने विसरून काही दिवसांसाठी माहेरी आलेली लेक खूप खुशीत असते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कित्येक विवाहित महिला माहेरी गेल्या नाहीत. प्रत्येक सण हा आनंद घेऊन येत असतो. उन्हात गेल्याशिवाय सावलीचे महत्त्व कळत नाही, असे म्हणतात. प्रत्येक दु:खाला एक सुखाची किनार असते. तद्वतच आखाजीसाठी वर्षभर वाट बघणाऱ्या महिला दोन वर्षांपासून हिरमुसल्या आहेत. आखाजीचा सण येऊनही माहेरी जायला न मिळाल्याने सणाच्या दिवशी कित्येक महिलांचे डोळे पाणावलेत. ते झोके, तो नदीचा काठ, त्या मैत्रिणी, आमरस, पुरणपोळीचे आईच्या हातचे जेवण हे सर्व आठवून ओठावर हसू आणि डोळ्यात आसू घेऊन सासुरवाशीण महिला स्वत:च्या संसारासाठी, आरोग्यासाठी कोरोनाच्या काळजीपोटी स्वत:चे मन मारत आहेत. त्यावेळेस बहिणाबाईंचीच एक ओळ ओठावर येते- लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...- शिल्पा देशमुख, मालेगाव
माहेरवाशिणींच्या आनंदावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:59 PM
नाशिक : यावर्षी भाऊ किंवा वडील मुराळी म्हणून येईल आणि आपल्याला माहेरी घेऊन जाईल या वेड्या आशेवर अनेक सासुरवाशिण महिला आखाजीच्या पंधरा-वीस दिवस आधीपासून माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती यायची, मोठ्या आनंदाने माहेराला न्यायची. मग सुरू व्हायचा मौज, मस्ती, गाणी आणि आठवणींचा सिलसिला. मात्रए दुर्दैवाने, या आनंदावर कोरोनाच्या वैश्विक महामारीने सलग दुसऱ्या वर्षी विरजण फिरविल्याने महिलावर्गातून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देअक्षय तृतीया : यंदा कसमादे पट्ट्यात ना झोके झुलले, ना ओठावर उमटली गाणी