शिक्षकांचे वेतन रखडल्याने ३ मे रोजी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनाच्या वेळी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी ५ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन होईल तसेच १० तारखेपर्यंत एप्रिल महिन्याचे वेतन होईल, असे सांगितले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक शाळांचे मार्च महिन्याचे वेतन झालेले नाही. अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. डी.सी.पी.एस. धारकांचा सातव्या वेतन आयोगाचा रोखीने द्यायचा दुसरा हफ्ता अजून मिळाला नाही. शासनाने शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेस करावे, असा शासन निर्णय काढलेला असूनही वेतन पथक अधीक्षक उदय देवरे हे शिक्षकांच्या आर्थिक समस्या गांभीर्याने घेत नाहीत, यामुळे जिल्हा वेतन पथकाचा ढिसाळ कारभार लक्षात येत असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.
कोट...
जिल्ह्यातून सातत्याने वेतन अधीक्षक देवरे यांच्या बदलीची मागणी होत आहे. अनेकदा आंदोलन व निवेदने देऊन झालीत तरी शिक्षक समस्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. शिक्षक मागणी बघता टीडीएफ लवकरच मोठे आंदोलन पुकारेल.
- आर.डी. निकम, जिल्हाध्यक्ष, टीडीएफ