नाशिक : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधी नियोजनावरून जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये धूसफूस सुरू आहे. बुधवारी (दि. ३०) याच धूसफुशीमुळे एका पदाधिकाऱ्यासह गटनेते व सदस्यांची एका अधिकाऱ्याच्या कक्षेत गुप्त बैठक झाल्याचे समजते.या गुप्त बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेसाठी प्राप्त झालेल्या सुमारे १५ कोटींच्या ्रअसमान वाटपावरून संबंधित पदाधिकारी व गटनेत्यांसह सदस्यांनी खदखद व्यक्त केल्याचे समजते.जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १५ कोटींचा नियतव्यय तर लघुपाटबंधारे विभागाला सुमारे ७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच लघुपाटबंधारे विभागाच्या असमान निधी वाटपावरून सदस्यांमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता हा निधी जिल्हा परिषदेला मंजूर होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी या निधीचे नियोजन अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्षात या निधीचे नियोजन करून कामांना सुरुवात होण्यास आॅक्टोबर शेवट किंवा नोव्हेंबर उजाडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून आलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढू लागला आहे. सदस्यांना विश्वासात घेऊनच नियोजन केले जावे, अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या सर्वसाधारण सभेत दिसतील,अशी खासगीत सदस्य धमकी वजा सूचनाच देत असतानाच आता गुप्त बैठकाही त्यासाठी घेण्यात येत असल्याने हे निधी नियोजन गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या रस्ते आणि बंधाऱ्यांच्या कामांसाठी लवकरात लवकर नियोजन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आता हालचाली कराव्या लागतील, अशी चर्चा सदस्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)
धूसफुशीचे रूपांतर ‘गुप्त’ बैठकीत
By admin | Published: October 01, 2015 12:34 AM