नाशिक : महापालिकेत घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण करण्यासाठी शिवसेनेचाच छुपा अजेंडा असून, त्यांनी यासंदर्भात गुप्त बैठका घेऊन तसेच आयुक्तांवर दबाव आणून महासभेवर प्रस्ताव सादर करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फेाट महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी केला. विविध योजनांसाठी सोयीचे ठेकेदार आणून प्रत्यक्षात मात्र भाजपचे षड्यंत्र रचण्यात आले, असेही ते म्हणाले.
घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण करण्याचे घाटत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर भाजपमधील काहींनी त्यास विरोध केला. हीच संधी साधून शिवसेनेनेही भाजपवर टीका केली; मात्र शुक्रवारी (दि.८) सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी भाजपवर पलटवार केला असून, त्यात खासगीकरणातून मन्नुभाई आणण्यामागे शिवसेनेनेच घाट घातला असल्याचा आरोप केला.
नाशिक महापालिकेत घरपट्टी आणि खासगीकरणासाठी एका ठेकेदारासमवेत शिवसेनेने गुप्त बैठक घेतली आणि त्यांच्या समझोत्यानंतरच आयुक्तांची भेट शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतली. राज्यात असलेल्या सत्तेचा दबाव आयुक्तांवर आणून खासगीकरणाचा प्रस्ताव आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ऐनवेळी ज्यादा विषयात हा विषय मांडण्यात आल्याने भाजपने दाखलमान्य झाला असला तरी त्यावर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यात आली नाही; मात्र विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने प्रशासनाचा विषय मागे घेतला, असे सतीश सोनवणे व गटनेता जगदीश पाटील यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेत नोकर भरतीसाठी राज्य शासन परवानगी देत नाही. शासनाच्या काही जाचक अटींमुळे महापालिकेत काही कामांचे खासगीकरण केले जात आहे, अशा स्थितीत आपला डाव फसल्याने शिवसेना सैरभैर हाेऊन भाजपवर आरोप करीत आहे, असेही सोनवणे पाटील म्हणाले.