ओझर : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी बाजार समितीचे मयत कर्मचारी पारस कोचर यांची फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असताना पोलिसांकडे आलेला तक्र ारअर्ज अद्यापपर्यंत तपासासाठी स्थानिक निरीक्षकांनी हातात घेतला नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.पारस कोचर हे मयत झाल्यानंतर संजय पाटील यांनी सदर रक्कम जयवंत तेलंग यांच्या खात्यावर परस्पर वर्ग करून लाटली. मयत कोचर यांची पत्नी शर्मिला यांनी अनेकवेळा सचिवांचे दार ठोठावले; परंतु वातानुकूलित कार्यालयात बसलेल्या पाटील यांनी त्यांना जुमानले नाही. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांमध्येदेखील याबाबत संतापाची लाट कायम आहे. शर्मिला यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आता पोलिसांनी तरी या प्रकरणाचा जलद गतीने तपास करावा अशी अपेक्षा पत्नी त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान पाटील यांनी मयताचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत असताना त्यांना अंधारात ठेवून व सभापतींना कोणताही सुगावा लागू न देता केलेले हे कारनामे आता जिल्हाभरात चर्चिले जात आहेत. स्थानिक पोलिसांनी न्याय न दिल्यास कोचर वरिष्ठांना साकडे घालण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी पाटील यांच्याविरु द्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पिंपळगाव बसवंत ही आजमितीस सर्वाधिक उलाढाल असलेली बाजार समिती आहे. येथे दोन-तीन जिल्ह्यांतील शेतकरी येतात. त्यांच्यासाठी इतका मोठा आवार उपलब्ध आहे; परंतु आजदेखील येणाºया प्रत्येक शेतकऱ्यांनी सचिव पाटील यांच्या या कारनाम्याविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने सुरू असलेली पिंपळगाव बाजार समिती आशिया खंडात नावाजलेली असताना तेथे असे कृत्य घडणे हे न शोभणारे आहे. इतका सबळ पुरावा असताना सभापती हे सचिवाविरु द्ध कठोर कारवाई करण्यास दिरंगाई का करतात हेच समजत नाही. वास्तविक अशा सचिवास त्वरित निलंबित करायला हवे.- राजेंद्र मोगल, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती