सातपूर : कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करतानाच म्युकरमायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून राज्य शासनाने "मिशन ऑक्सिजन स्वावलंबन" योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नाशिक विभागातून तूर्त १४ उद्योजकांनी अनुकूलता दर्शविली आहे. ऑक्सिजन उत्पादन (प्लान्ट सुरू) करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासनाने भरघोस प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा स्वयंभू व्हावा, हा उद्देश सफल झाल्यास भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उद्योग विभागाने "मिशन ऑक्सिजन स्वावलंबन" अंतर्गत राज्यामध्ये नवीन तसेच विस्तारीकरण प्रकल्प प्राणवायू (ऑक्सिजन) उत्पादन उभारण्याकरिता विशेष प्रोत्साहने घोषित केलेली आहेत. या योजनेंतर्गत पात्र उद्योजकांना त्यांनी केलेल्या स्थिर भांडवली गुंतवणकीच्या १०० ते १५० टक्के वस्तू व सेवाकर परतावा, मुद्रांक शुल्क माफी, ५ वर्षाकरिता २ रुपये प्रति युनिट विद्युत दर अनुदान, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांकरिता ५ टक्के व्याजदर अनुदान आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात प्रस्तावित होणाऱ्या प्राणवायू प्रकल्पासाठी भूखंडात प्रचलित दरापेक्षा २५ ते ५० टक्के सवलत, तसेच सुलभ हप्त्यात भूखंडाचा ताबा देण्यात येणार आहे. भूखंडाबाबतचे धोरण ३ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहे.
प्राणवायू ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे गुंतवणूक त्वरित कार्यान्वित करण्यासाठी लागणारे सर्व परवाने, नाहरकत प्रमाणपत्रे मिळण्यासाठी एक खिडकी योजनेंतर्गत १५ दिवसात एकत्रित परवानगी देण्यात येणार आहे. प्रकल्पामध्ये सुरु करणे व प्रोत्साहनासाठी विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, मुंबई यांच्याकडे दि.३० जूनपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अशी माहिती नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी दिली. दरम्यान, नाशिक विभागात एकूण ८ प्राणवायू प्रकल्प व १७ प्राणवायू पुर्भनरण केंद्रे कार्यरत आहे. नाशिक विभागात प्राणवायू पुरवठा राज्यातील इतर भागातून होत असल्याने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी १४ उद्योजकांनी अनुकूलता दर्शविली आहे.
इन्फो== आगामी काळात प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या "मिशन ऑक्सिजन स्वावलंबन" योजने अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १४ उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. यामधून १५०...................... मेट्रिक टन प्रतिदिन अतिरिक्त प्राणवायू तयार होणार आहे.
-शैलेश राजपूत, उद्योग सहसंचालक नाशिक विभाग