नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (दि.७) सुरुवात झाली असून, शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी १८ कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. यात नाशिक जिल्ह्णातील पाच जणांचा समावेश असून, जळगावला तब्बल १३ जणांना नक्कल करताना शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने पकडले आहे. जळगावमधून १३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यास भरारी पथकातील शिक्षण अधिकाऱ्यांना यश आले. नक्कल करताना पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेला विभागातील एकूण २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी ४१७ केंद्रांच्या माध्यमातून सामोरे जात आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शिक्षण मंडळाची २८ भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवून आहेत. यात नाशिक जिल्ह्णात नऊ भरारी पथके विविध परीक्षा केंद्रांवर नजर ठेवून आहेत, तर धुळे जिल्ह्णात सहा भरारी पथकांचे परीक्षेवर लक्ष आहे. जळगावमध्येपाच भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवून असून, त्यांनी मंगळवारी १३ विद्यार्थ्यांना नक्कल करताना पकडले. नंदुरबारमध्ये चार व विभागीय स्तरावर चार अशी भरारी पथकांची नेमणूक असून, नाशिक आणि जळगाव वगळता दहावीचा पेपर संपूर्ण विभागात सुरळीत पार पडल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१८ कॉपीबहाद्दरांवर विभागात कारवाई
By admin | Published: March 08, 2017 1:39 AM