नाशिक : गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंद असलेले भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवारपासून ३० टक्के कामगारांना बोलावून सुरू करण्यात आले. सोमवारी (दि.१८) सकाळी प्रतिज्ञापत्र व टेंम्प्रेचर तपासून लिहून देण्याचा अर्ज घेताना काही काळ गोंधळ झाल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.कोरोनाच्या संकटामुळे गेल्या पावणे दोन महिन्यापासून नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय बंद होते. चार दिवसांपूर्वीच जेलरोड येथील नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू झाले. तेथेदेखील गरजेनुसार कामगार बोलाविले जात आहेत. सोमवारी (दि.१८) भारत प्रतिभूती मुद्रणालय सकाळी आपल्या निर्धारित वेळेत सुरू झाले. मुद्रणालय व्यवस्थापनाकडून पहिल्या दिवशी कारखान्यातील तीस टक्के कामगारांना कामावर रु जू होण्याचे सांगण्यात आले होते. कारखान्यात जाण्यापूर्वी कामगारांना मालेगाव, मुंबई यांसारख्या रेड झोनमध्ये जाऊन आलो नाही असे प्रतिज्ञापत्र तसेच स्वत:चे टेंपरेचर तपासून अर्ज भरून द्यायचा होता. सदर अर्ज कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर स्टाफ रेस्ट शेडमधील इमारतीत देण्यात येत होता. त्याठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे रांग लावताना काही काळ गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेरीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी हस्तक्षेप करून सर्व काम सुरळीत केले. कारखान्याच्या प्रत्येक गेटवर बेसिन लावले असून, हात धुवून नंतर सॅनिटायझर टनेलमधून फवारणी करून घेणे सक्तीचे केलेले आहे.तसेच प्रत्येकला हॅन्डग्लोज व मास्क देण्यात आले. कामावेळी सोशल डिस्टन्सिंग व अन्य खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येत होती. कारखान्यात सध्या प्रथम प्रिंटिंग, एक्झामिन, कटिंग, फिनिशिंग अशी टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत. बंदच्या काळात कमी मनुष्यबळात आयएसपीने पन्नास हजार इमर्जन्सी पासपोर्ट सर्टिफिकेट्स, बॅँकांचे धनादेश पुस्तके, दीड लाख कृषी सील तयार करून दिली. तीन हजार पासपोर्ट दिल्लीला पाठवले. सुटीत पन्नास दशलक्ष नोटाही छापून देण्यात आल्या आहेत.
प्रतिभूती मुद्रणालयाचे कामकाज पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:34 PM