लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गोदाघाटासह महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षक उपलब्ध न केल्यास ई-निविदा काढून सुरक्षारक्षक नियुक्तीस स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रांवर शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्तीचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षामार्फत सद्यस्थितीत होळकर पूल ते कन्नमवार पूल यादरम्यान गोदाघाटावर प्रदूषण रोखण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत, परंतु त्यांची मुदत आता संपत आल्याने प्रशासनाकडून गोदाघाटावर वर्षभराच्या कालावधीकरिता ९० सुरक्षारक्षक व पाच पर्यवेक्षक नियुक्तीचे प्राकलन स्थायी समितीवर मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी वत्सला खैरे यांनी सिंहस्थात नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांना त्यात प्राधान्य देण्याची मागणी केली तर जगदीश पाटील यांनी सद्यस्थितीत गोदाघाटावर नेमलेल्या सुरक्षारक्षकांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सुरक्षारक्षकांना नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहण्याची सूचनाही पाटील यांनी केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी माजी सैनिक मंडळ आणि नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षक उपलब्ध न झाल्यास ई-निविदा काढून सुरक्षारक्षक नेमण्यास मान्यता दिली. याचवेळी पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या पत्रानुसार महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवरही सुरक्षारक्षक नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्यावर सूर्यकांत लवटे यांनी शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना केली. सभापतींनीही पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रावर शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नितांत गरज असल्याचे सांगत जलशुद्धीकरण केंद्रांवर शस्त्रधारी रक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिले. याशिवाय, बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्राकलन तयार करण्याच्याही सूचना दिल्या.कामचुकार व्हॉल्वमनच्या बदल्या कराभागवत आरोटे यांनी व्हॉल्वमन काम करत नसल्याची तक्रार केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीही व्हॉल्वमनच्या कामकाजांबाबत नापसंती व्यक्त केली. जे व्हॉल्वमन काम करत नसतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे तसेच त्यांच्या अन्यत्र बदल्या करण्याचेही आदेश सभापतींनी दिले. व्हॉल्वमनसंबंधी एक बैठक स्थायी समितीमार्फत घेण्याची सूचना सभापतींनी प्रशासनाला केली.
सुरक्षारक्षक नियुक्तीस मान्यता
By admin | Published: May 23, 2017 1:33 AM