बाबासाहेब गोसावी, नाशिक : पिंपळद येथील वालदेवी धरण परिसरात येणाऱ्या अनेक पर्यटकांना पोहता येत नसताना, विनाकारण पाण्यात उतरण्याचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. गेल्या वर्षभरात दहा ते बारा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तरीही या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक गावकर्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे .
स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील या ठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या ठिकाणी अनेकांचे बळी जात आहेत. पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात , मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. याच गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा व्यवस्थापन समिती प्रशासनाकडून स्थानिक पोलीस प्रशासनाने समन्वय साधून धरण परिसरात होणाऱ्या पार्ट्याना अटकाव करावा , अशी मागणी पिंपळद ग्रामस्थ, शेतकरी व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.---नाशिक शहराला लागून अनेक तलाव असून त्यामध्ये विल्होळी, पिंपळद, मुकणे, गंगापूर या धरण परिसरात नाशिक, सिडको येथून अनेक तरुण येत असतात, पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात, पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज येत नसल्याने अनेक दुर्दैवी घटना घडतात. गावकरी, शेतकरी यांना खूप त्रास होत असतो. पिंपळद ग्रामपंचायत, स्थानिक पोलिस स्टेशन या प्रशासनाला खूप त्रास होतो. - निर्मलाताई कड , उपसरपंच, पिंपळद