-------
मायको रुग्णालयात कठोर उपाययोजना
सातपूरच्या मायको या रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये महिला आणि पुरुष असे स्वतंत्र सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली आहे. ते नियमित जागेवर त्यांचे कर्तव्य बजावत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. रुग्णालयात येणाऱ्यांची चौकशी आणि खात्री करून आत सोडत होते. तशी रजिस्टरमध्ये नोंद घेण्यात येत असल्याचे दिसून आले. मायको रुग्णालयात विशेष करून प्रसूती होत असल्याने हा प्रसूती कक्ष वेगळा आहे. तेथे महिला सुरक्षारक्षक तैनात आहे. एका वेळी एकच नातेवाईक भेटण्यासाठी जाऊ शकतात. त्याची खात्री करून तशी नोंद केली जाते. या कक्षात पुरुषांना जाण्यास मनाई आहे. दोन प्रवेशद्वार असले तरी एका वेळी एकच प्रवेशद्वाराचा वापर केला जातो. भेटण्याचा वेळा ठरवून दिलेल्या आहेत. अनोळखी अथवा विनापरवानगी कोणीही रुग्णालयात जाणार याची काळजी घेतली जाते. बाळ जन्माला आल्यानंतर रुग्णालयाच्या रजिस्टर बरोबरच सुरक्षारक्षकांच्या रजिस्टरमध्येदेखील नोंद केली जाते.
------
बिटको रुग्णालयात कडेकोट सुरक्षा
नाशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात दिवस-रात्र तीन पाळीमध्ये ५० सुरक्षारक्षक सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले असून, रुग्णालयाच्या आतमध्ये व बाहेरील बाजूस सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाचा मुख्य दरवाजा रात्री दहा वाजता बंद केला जातो.
बिटको रुग्णालयात उपचारावरून व इतर कारणावरून वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मनपाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक तैनात केलेले आहेत. रुग्णालय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी एकूण चार ते पाच सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. रुग्णालयाच्या आतमधील सर्व विभागात, पॅसेजमध्ये व रुग्णालयाच्या बाहेरील आवारात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सर्व कॅमेरे सुस्थितीत सुरू आहेत. रुग्णालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस केली जात असून, रुग्णालयात येण्यासाठी एकच मुख्य गेट असून इतर बाजूकडून सर्वत्र संरक्षक भिंत व तारेचे कुंपण बांधून कडेकोट सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यात आली आहे.
----------
इंदिरा गांधी रुग्णालयाला सीसीटीव्हीची प्रतीक्षा
पंचवटीतील राजवाडा नजीक असलेल्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. तसेच रुग्णालयात खाजगी सुरक्षारक्षक नेमले असले तरी, कोणाचीही चौकशी केली जात नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात सुरक्षारक्षक उपस्थित असले तरी ते रुग्णालयात असलेल्या एका कक्षात बसलेले होते, तर दुपारच्या वेळी रुग्णसंख्या कमी असल्याने वर्दळ कमी असते असे रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा रुग्णालयात घडलेल्या बालिका अपहरण घटनेची पुनरावृत्ती इंदिरा गांधी रुग्णालयात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रुग्णालयात दैनंदिन येणाऱ्यांची नोंद ठेवणे व प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक कायम तैनात असणे गरजेचे आहे.
--------
मोरवाडीचे रुग्णालय ‘राम भरोसे’
सिडकोतील मोरवाडी येथील महापालिकेच्या श्रीस्वामी समर्थ रुग्णालयात दररोज असंख्य नागरिक उपचारांसाठी तसेच अनेक महिला प्रसूतीसाठी येतात. परंतु रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केलेली नसून संपूर्ण रुग्णालयच ‘राम भरोसे’ असल्याचे दिसून आले. या रुग्णालयात सकाळच्या सुमारास दररोज शेकडो रुग्ण तात्पुरती तपासणी करण्यासाठी येतात. याबरोबरच रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर महिलांचे प्रसूतिगृह आहे. परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. रुग्णालयात प्रवेश करताना सुरक्षारक्षकांकडून कुठलीही विचारपूस केली जात नाही. सुरक्षारक्षक जागेवर बसलेले होते, त्यांचे सारे लक्ष हातातील भ्रमणध्वनीवर होते. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु त्यांना लसीकरणाची कामे करावी लागतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे आढळून आले आहे.
-------
जाकीर हुसेन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली
जुन्या नाशकातील जाकीर हुसेन रुग्णालयात जुने नाशिक, द्वारका, वडाळा गावसह परिसरातून औषध उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. त्यामुळे या रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील प्रवेशद्वार व पॅसेजमध्ये असे एकूण बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांकडून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून रजिस्टरवर तशी नोंद करण्यात येत आहे.