नाशिक : लॉकडाउनच्या काळात घरातून माणसे बाहेर पडण्यावर मर्यादा आल्याने मेरीच्या जंगलातील मोरांचा दानापाणी आटला आणि मोरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तहान-भूक भागविणाऱ्या माणसांचे रोजचे चेहरे दिसेनासे झाल्याने सैरभैर झालेल्या मोरांची आर्तता सुरक्षारक्षकांनी जाणली आणि तेच आता या मोरांचे ‘रखवालदार’ झाले आहेत. परिस्थिती नसतानाही घरात असलेला गहू, तांदूळ आणून हे सुरक्षारक्षक मोरांची काळजी घेत आहेत. नाशिकच्या निसर्ग संपन्नेत भर घालणाºया मेरीच्या जंगलाचे महत्त्व येथील मोरांच्या वास्तव्यामुळे अधिकच वाढले आहे. काही दानशूर आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी येथील मोरांची जबाबदारी घेत त्यांच्यासाठी रोज धान्य देण्याची जबाबदारी घेतली आहे तर काही दुकानदार आवर्जून मोरांसाठी धान्य घेऊन येत असल्याने मोरांसाठी रोजच सकाळ आणि सायंकाळी मेजवानी ठरते. परंतु लॉकडाउनमुळे आता येथील ५० ते ६० मोरांना नेहमीप्रमाणे दानापाणी मिळत नसल्याने मोरांची उपासमार होऊ लागली होती.जंगलात मुक्त विहारणाºया मोरांचा रोजच्या आवाजातील बदल येथील सुरक्षारक्षकांनी ओळखला आणि त्यांनी आता या सर्व मोरांसाठी दानापाणी सुरू केला आहे. खरेतर येथील सहाही सुरक्षारक्षक हे तात्पुरते असल्याने त्यांची परिस्थितीही बेताचीच आहे. अशाही परिस्थितीत दीपक दळवी, गणेश चव्हाण, शरद राजभोज, कृष्णा शेवाळे, रतिलाल साळुंखे, हेमंत सारन हे सुरक्षारक्षक घरात असेल ते धान्य घेऊन येतात आणि या मोरांना खाऊ घालतात. असे किती दिवस चालणार असा प्रश्न मात्र या कर्मचाऱ्यांना सतावत आहे. जोपर्यंत ड्यूटी आहे तोवर ठीक. लॉकडाउन वाढतच गेला तर काय होणार हा प्रश्न मोरांविषयी अधिक काळजी वाढविणारा ठरत आहे.--कोट--जंगलात राहणाºया मोरांची उपजीविका जंगलात कशीही होईल. परंतु माणसांची ओढ लागल्याने खाण्यासाठी धान्य देणाºयांचा शोध त्यांच्या नजरेत दिसतो. सकाळी आणि सायंकाळी ते झाडावरून उतरून खाली धान्य शोधत फिरतात. त्यांच्या आवाजाने त्यांच्या भुकेचाही अंदात येतो. जमेल तेवढे आम्ही करतच आहे. गरज आहे त्यांना रोजच धान्य देणाºया दानशुरांची.- दीपक दळवी, सुरक्षारक्षक
सुरक्षा कर्मचारीच बनले मोरांचे ‘रखवालदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 9:54 PM