वाऱ्याने प्लास्टिकचे बॅरिकेडस् गेले उडून
नाशिक : शहरातील विविध परिसरात केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले असून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले छोटे-छोटे प्लास्टिकचे बॅरिकेडस् मागील दोन दिवसांपासून सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे उडून इतरत्र पडले आहेत. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक दुचाकी वाहने खड्ड्यांमध्ये आदळतात. काही ठिकाणी दुचाकीस्वार जखमीही झाले आहेत. केबलसाठीचे खड्डे बुजविलेले असले तरी त्याचे काम व्यवस्थित न झाल्याने त्या ठिकाणी खटकी तयार झाली आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्याने कार्यकर्त्यांत नाराजी
नाशिक : अण्णाभाऊ साठे यांची रविवारी (दि. १) जयंती असल्याने अनेक पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता जीपीओ रोडवरील साठे यांच्या पुतळा परिसरात गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी पथदीप बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. जयंतीनिमित्त पुतळ्याभोवती करण्यात आलेली विद्युत रोषणाईही काही काळ बंद असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अंधारातही कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमुन गेला होता.
श्रावणमासानिमित्त मंदिरांची रंगरंगोटी
नाशिक : व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण महिना जवळ आला असल्याने शहरातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छतेसह रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. सिद्धेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर मंदिर, मनकामेश्वर महाराज मंदिर, तीळभांडेश्वर लेन येथील महादेव मंदिर आदी ठिकाणी रंगरंगोटीची कामे सुरू असल्याचे दिसून आले. मंदिर अद्याप सुरू झालेली नसली तरी अनेक भाविक बाहेरून देवाचे दर्शन घेत असतात. श्रावणात ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मंदिरांमध्ये स्वच्छतेची कामेही सध्या सुरू आहेत.