- शैलेश कर्पे
सिन्नर (नाशिक) : माऊली... माऊली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ -मृदुंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असे नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तीमय भारावलेल्या वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल्या दातली येथे पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी वारकºयांसह सुमारे ५० हजार वैष्णवांचा मेळा येथे भरला होता.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा शुक्रवारी रात्री लोणारवाडी येथे मुक्काम झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी कुंदेवाडी येथे भोजन झाल्यानंतर दातली शिवारात रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिंगण सोहळ्यासाठी दातली शिवारात पालखी दुपारी तीन वाजता पोहचली. पालखी रथातून काढताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. पालखी तळावर येताच सर्व आसमंत माऊलीमय होऊन गेला होता. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकण्यात आला होता. सोहळ्यातील रिंगण पाहण्यासाठी परिसरातून भक्तीचा सागर लोटल्याचे चित्र होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी आतुर झाल्याचे दिसून येत होता.
दुपारी चार वाजता पूर्ण रिंगण लावून झाल्यानंतर जरी पटका निशाणाने रिंगणाभोवती फेºया मारल्यानंतर अश्व वायू वेगाने धावू लागताच भाविकांच्या माऊली माऊली अशा आरोळ्या उठल्या. टाळ्यांच्या कडकडाटात अश्वाने फेºया पूर्ण केल्या. यावेळी वारकºयांमधून टाळ-मृदुंगाच्या निनादाने सारे आसमंत दुमदुमून गेले होते. हजारों लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण लक्ष लक्ष नयनांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. अश्वरिंगणानंतर देवरिंगण, टाळकरी रिंगण व विणेकºयांचे रिंगण झाले. त्यानंतर महाआरती झाली. आरतीनंतर भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.